अकोला दिव्य न्यूज : आकाशातील ग्रह ताऱ्यांचा नजारा प्रत्येक मानवी जीवाला भुरळ पाडुन जातो. अशातच एखादी अनोखी घटना दिर्घकाळ स्मरणात राहते. नव्या वर्षाच्या पहिल्या महिन्याच्या उत्तरार्धात दिवसा फक्त सूर्य आणि रात्री सर्वं ग्रह अन् तेही रात्रीच्या प्रारंभी व कृष्ण पक्षातील अंधाऱ्या वेळी,असा हा आकाशातला अनोखा नजारा खूपच मनोवेधक असेल. आकाशात सर्व ग्रह आज मंगळवार दिनांक २१ जानेवारीपासून सूर्याच्या एका बाजूला येत असल्याने ही खगोलीय घटना प्रत्यक्षात साकारण्यात आली आहे.
जठारपेठतील श्री.सिद्धिविनायक मंदिरात रांगोळीच्या माध्यमातून साकार करण्यात आली आहे. रांगोळीतून साकारलेले हे दृश्य आजपासून सात दिवसांसाठी सर्वाना बघण्यासाठी कायम ठेवले जाणार आहे. सामाजिक कार्यकर्ते निलेश देव यांच्या हस्ते या प्रतिकृतीचे उद्घाटन करण्यात आले. मंदिराचे अध्यक्ष ॲड. चंद्रशेखर जोशी व सर्व विश्वस्तांचे सहकार्य आणि खगोल निरीक्षक प्रभाकर दोड यांच्या कल्पनेतून ही आकाशातील ग्रह स्थिती दर्शक रांगोळी आजपासून आठवडाभर सकाळी ७ ते १२-३० व संध्याकाळी ५ ते ९ या कालावधीत खुली राहील. रांगोळी साकारण्यात सुजाता वाढोणकर यांचे सहकार्य लाभले.
दिवसा मंदिराच्या प्रांगणात आणि रात्री प्रत्यक्ष नभांगणात असा अनुभव दर्शकांना घेता येईल. या अनोख्या कार्यक्रमाला सुनील सरोदे, गजानन भुते, गट्टू गुरुजी, शरद अग्नीहोत्री, भाऊ अमृतकर, श्रीधर गुहे, दयाराम राठोड, रोशन बोर्डे इ. मंडळी उपस्थित होती.या वैज्ञानिक घटनेचा आनंद मंदिर प्रांगणात अधिकाधिक लोकांनी विशेषतः विद्यार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहन मंदिराच्या विश्वस्तांनी केले आहे.त्याचा आनंद घेण्याचे आवाहन विश्वभारती केंद्राचे प्रमुख प्रभाकर दोड यांनी केले आहे.
प्रत्येक ग्रहाचा परिवलन व परिभ्रमण काळ वेगवेगळा असल्याने नेहमी सर्वत्र विखुरलेले ग्रह क्वचित प्रसंगी एका बाजूला येतात. तशी स्थिती सध्या आकाशात दिसुन येत आहे. यामध्येच पृथ्वीला सर्वात जवळ असलेला चंद्र सुध्दा दि.२१ ते २६ जानेवारी या वेळेस सामील होत आहे. त्यामुळे या अतीदूर्मिळ घटनेला अधिक महत्त्व आले आहे. ही स्थिती आकाश प्रेमींसाठी एक अनोखी पर्वणी असुन रात्रीच्या प्रारंभापासून पहाटे पर्यंत ग्रह दर्शनाचा लाभ सप्ताहभर घेता येईल.
सध्या स्थितीत पश्चिमची शोभा वाढविणारा शुक्र व शनी हे दोन्ही एकमेकांजवळ कुंभ राशीत तर सर्वात मोठा गुरु ग्रह आणि सध्या पृथ्वीच्या जवळ आलेला लालसर रंगाचा मंगळ ग्रह पूर्व आकाशात तेजस्वी रुपात पाहता येईल. सोबत युरेनस व नेपच्यून दूर्बिणीतुन बघता येतील. एका अर्थाने या कालावधीत दिवसा आकाशात फक्त सूर्य आणि बाकी ग्रह रात्रीचे आकाशात असतील. दूसऱ्या अर्थाने आकाशातील बारा राशीतील सलग येणाऱ्या कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक आणि धनु राशी चंद्र व्हा ग्रहांचे शिवाय रिकाम्या असतील. अशी ही सर्व ग्रहांची परेड आकाशाच्या खुल्या प्रांगणात आपल्या दर्शनार्थ सज्ज आहे. सर्वांनीच हा अनोखा अपूर्व आकाश नजारा आपल्या डोळ्यात साठवून घ्यावा.असे आवाहन विश्वभारतीचे प्रभाकर दोड यांनी केले आहे.