Wednesday, January 22, 2025
HomeUncategorizedअकोल्याचा वैभवात भर घालणारे Deep Antiques Museum ! उद्या औपचारिक उद्घाटन

अकोल्याचा वैभवात भर घालणारे Deep Antiques Museum ! उद्या औपचारिक उद्घाटन

गजानन सोमाणी ; अकोला दिव्य न्यूज : बदलत्या काळासोबत नवीन पिढीला मागमूसही नसलेल्या, मात्र पूर्वजांच्या कर्तृत्वाची साक्ष आणि ऐतिहासिकदृष्ट्या अनमोल ठेवा असलेल्या अति प्राचीन, प्राचिन आणि अलिकडच्या वर्षांत कालबाह्य झालेल्या दुर्मिळ वस्तूंचा संग्रह एकाच छताखाली बघावयास मिळाल्या तर….तर हा एक अविस्मरणीय अनुभव राहणार. तेव्हा अशा अनुभव मिळवून देण्यासाठी आणि अकोला शहर व जिल्ह्यातील वैभवात भर घालीत ऐतिहासिक वारसा जोपासत, अकोलेकरांसह पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी नागपूर येथील ख्यातनाम आर्किटेक्ट संदीप कांबळे यांच्या संकल्पनेतून आणि अकोला येथील रियल इस्टेट व्यवसायीक प्रदीप उपाख्य गोटू नंद यांच्या अमूल्य सहकार्याने हा महत्वाकांक्षी प्रकल्प ‘दीप पुरातन संग्रहालय’ नावाने अस्तित्वात आले आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वरील अकोला शहरालगत असलेल्या बाभुळगाव पासून जवळच नंद पेट्रोल पंपाच्या बाजूला हे संग्रहालय उभारण्यात आले असून वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा अँड प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते उद्या सोमवार 20 जानेवारीला या प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात येणार आहे आणि मंगळवार 21 जानेवारीपासून सकाळी 9 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत हे संग्रहालय सर्वांसाठी खुले राहणार आहे. अशी माहिती या संग्रहालयाचे व्यवस्थापक डॉ.माधव देशमुख यांनी दिली.

*छायाचित्रात जगातील विविध देशांतील चलनी नाणीं*

अलिकडच्या काळात नवनवीन शोध लागत असल्याने काळाच्या ओघात कालबाह्य झालेल्या वस्तू अडगळीत टाकून देण्यात येत आहेत. मात्र, कधीकाळी मानवी जीवनाचा भाग असलेल्या या वस्तू अनमोल आहेत. त्यामुळे त्यांचे महत्व ओळखून दीप पुरातन वस्तू संग्रहालय साकारण्यात आले आहे.जगभरातील राज्यकर्त्यांची सांस्कृतिक प्रतीके, देशभरातील कलाक्षेत्रांचे प्रतिबिंब या ठिकाणी बघायला मिळणार आहे.आज आर्टिफिशल इंटेलिजन्सच्या युगात नवीन पिढी मोबाइलच्या आहारी गेली असून, आपल्या संस्कृतीतील अनेक बार्बीपासून अनभिज्ञ आहेत.कधीकाळी लाखमोलाच्या असलेल्या वस्तूंची माहिती व्हावी यासाठी भारतातील, जगभरातील पुरातन वस्तू ठेवण्यात आल्या आहेत.आर्कि.कांबळे, नंद तथा डॉ. देशमुख यांनी गत २० वर्षांमध्ये जगभरातून या वस्तू गोळा केल्या आहेत.येथे आल्यावर पर्यटक, अभ्यासक निश्चितच पुरातन काळात हरवून जाणार, असा विश्वास देशमुख यांनी व्यक्त केला.

माहिती देताना डॉ.माधव देशमुख व सहकारी

संग्रहालयात आहेत सर्व प्रकारातील कॅमेरे आणि फोन

या ठिकाणी फोनचा शोध लागल्यापासून तर आतापर्यंतचे विविध प्रकारचे फोन आहेत. फोनचा शोध लागला त्यावेळी फोन कसा होता, त्यामध्ये कसा बदल होत गेला. त्याचे प्रकार कसे होते, श्रीमंतांच्या घरी कशाप्रकारचे आगळे वेगळे फोन असायचे हे या ठिकाणी बघायला मिळणार आहे. तसेच गत १०० वर्षांमध्ये कॅमेराच्या विश्वात अनेक आमुलाग्र बदल झाले. कॅमेऱ्याचा शोध लागला तेव्हा बनविण्यात आलेल्या कॅमेऱ्या पासून तर डिजीटल कॅमेन्यापर्यंत विविध प्रकारचे कॅमेरे या ठिकाणी आहेत. सुरूवातीला कशाप्रकारे कॅमेरे होते, त्यातून कसे फोटो काढण्यात येत होते, याचे दर्शन येथे घडते. यासोबचत ब्लॅक अँड व्हाइट चित्रपट तयार होत असताना वापरण्यात येणारे व्हिडीओ कॅमेरे, लग्रांची शूटींग करण्याकरिता वापरण्यात येणारे कॅमेरे, शूटींग करताना कॅमेऱ्या सोबतच वापरण्यात येणाऱ्या विविध वस्तूही या ठिकाणी आहेत.

मोबाईल कॅमेरा येईपर्यंत चे कॅमेरे….

ग्रामोफोनवर ऐकता येणार गाणे. आता मोबाइलमध्ये चित्रपटातील तसेच विविध गाणे आपण एकतो. मात्र, पूर्वी ग्रामोफोनवर गाणे ऐकण्यात येत होते. ते ग्रामोफोन सुद्धा या ठिकाणी आहे. ग्रामोफोनपासून पेनड्रायूव्हवर गाणे ऐकण्यापर्यंत जो प्रवास झाला, त्यादरम्यान गाणे ऐकण्याकरिता वापरण्यात येणारे रेडीओ, सीडी प्लेअर, व्हीसीआर सुद्धा येथे संग्रहीत करून ठेणण्यात आला आहे. या ठिकाणी स्वातंत्र्यापासून तर आतापर्यंतच्या ३५०० रेकॉर्ड (कॅसेट) चे संकलन करण्यात आले.

रेडिओ, टेपरेकॉर्डर आणि ग्रामोफोन चे दालन

. पुरातन संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या वस्तू संग्रहालयात पुरातन संस्कृतीचे जतन घडविणाऱ्या अनेक वस्तू आहेत. यामध्ये स्वयंपाकासाठी वापरण्यात येणारी जुनी भांडी, पाणी गरम करण्याची भांडी, भांड्यांचे विविध प्रकार, किटलीचे प्रकार, पुरातन काळातील टिफीन, प्रवासादरम्यान पाणी घेवून जाण्याकरिता उपयोगात आणण्यात येणारी फिरकीची भांडी आहेत. तसेच अडकित्याचे अनेक प्रकार या ठिकाणी ठेवण्यात आले आहेत. जवळपास ६० ते ७० प्रकारचे अडकित्ते या ठिकाणी बघायला मिळतात. तसेच पान पुड्याचेही विविध प्रकार आहेत. साध्या पानसुपारीच्या पुड्यापासून तर श्रीमंतांच्या घरामध्ये वापरण्यात येणारे धातुचे पानपुडे या ठिकाणी आहेत.

शिवकालीन शस्त्रांचा संग्रह

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात युद्धात वापरण्यात येणाऱ्या शस्त्रांचा संग्रह या ठिकाणी करण्यात आला आहे. शिवकाळात युद्धामध्ये जी शस्त्र वापरण्यात येत होते, ती या ठिकाणी बघायला मिळतात. तसेच युद्धादरम्यान वापरण्यात येणारे चिलखत सुद्धा येथे आहे. पुरातन काळातील तलवारीचाही संग्रह येथे बघायला मिळतो. व जुन्या काळातील कुलपांचे प्रकार सुद्धा आहेत.

६४ कलांमधून घडते विविध संस्कृतीचे दर्शन

पुरातन वस्तू, मध्ययुगात शास्त्रज्ञांनी शोधलेल्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंसोबतच दीप पुरातन वस्तू संग्रहालयात एक विशेष कला दालन आहे. या कलादालनात जगभरातील विविध संस्कृतीतील कला बघायला मिळतात. या ठिकाणी सांजी, रेशम आर्ट, मधूबनी, गॉड आर्ट, गॉदणी, पिछवइ, मंडाला, चॅरीअल, संथाल, मिनाकारी, मिल आर्ट, पटचित्र, सौर आर्ट, वारली, म्यूरल, भरणी, कचनी, कॉफी, केरला म्यूरल, डॉट, ग्लास पेंटींग, कलमकारी, अँटिक, ट्रायबल आर्ट, लीपण आर्ट, मिक्समेडी आर्ट, पॉप आर्ट आदी प्रकारच्या कला आहेत. एवढ्या विविध प्रकारच्या कला एकाच ठिकाणी बघायला मिळणे, ही कलाप्रेमींसाठी एक पर्वणीच ठरणार आहे. आर्टिस्ट दीपा शर्मा यांनी अनेक वर्षे विविध संस्कृतीचा, विविध कलांचा अभ्यास केला.

दीपा शर्मा यांना लहानपणापासूनच कलाक्षेत्राची आवड जगातील विविध देशांमध्ये जावून त्यांनी तेथील कलाकरांना भेटून त्यांनी कला समजून घेतल्या. त्यांच्याकडे असलेल्या कलांची नवीन पिढीला, तरूणांना माहिती व्हावी यासोबतच त्यांच्यामध्ये पारंपारिक कलांबद्दल आवड निर्माण व्हावी, याकरिता त्यांनी हे विशेष दालन तयार केले आहे. कला व संस्कृती या विषयामध्ये पी. एचडी, करणाऱ्यांसाठी हे दालन मार्गदर्शक ठरणार आहे. कलेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे दालन महत्वपूर्ण ठरणारे आहे. दीपा शर्मा यांना लहानपणापासूनच कलाक्षेत्राची आवड आहे, त्यादृष्टीने त्यांनी अभ्यास केला, कला समजून घेतल्या.कलांची माहिती घेण्याकरिता त्यांनी विविध संस्कृतींचा अभ्यास केला. ‘बेस्ट आऊट ऑफ वेस्ट’ पासून त्या विविध प्रकारचे क्राफ्ट तयार करतात. दोन्ही हातांनी मेंहदी लावण्याची कला त्यांना अवगत आहे. तसेच पाच भाषांमध्ये म्यूरल रायटींगमध्ये त्यांची पुस्तके प्रकाशित झाली आहेत. या संग्रहालयात आल्यावर नवीन पिढी जेव्हा विज्ञान, इतिहास,कला आणि विविध संस्कृतीचे दर्शन घेऊन बाहेर येणार तेव्हा प्रेरणादायी वारसा सोबत घेऊन जाईल, हे नक्की!

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!