अकोला दिव्य न्यूज : संपुर्ण महाराष्ट्रात विक्रीसाठी प्रतिबंधीत असलेल्या चायनीज मांज्याची सरेआम होत असलेल्या विक्रीने अखेर अकोल्यात एका निष्पाप जीवाचा बळी घेतला आहे. आज मकरसंक्रांतीच्या दिवशी घडलेल्या या घटनेमुळे सोनोने कुटुंबावर संकट कोसळेल असून अकोला जिल्हा पोलिस प्रशासनाच्या कार्यक्षमता आणि कर्तव्यावर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. पोलिस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या अनेक दुकानातून हा मांजा विकल्या जातो, हे लोकांना उघड्या डोळ्यांनी दिसतं आहे. मात्र पोलिस आणि त्यांच्या खबरींना कसे माहित नाही !
आज 14 जानेवारी रोजी मकर संक्रांतीला कामानिमित्ताने अकोट येथून कामानिमित्ताने किरण प्रकाश सोनोने हे अकोला येथे आले होते. सायंकाळी किरण सोनोने (वय 35) दुचाकीने नवीन एसपी ऑफिसकडे जात असताना नायलॉन मांजा गळ्यात आवळा गेला आणि रक्तबंबाळ अवस्थेत मोटारसायकल वरून खाली कोसळले. या घटनेत सोनोने यांचा मृत्यू झाला. या दुःखद घटनेने शहरातील नागरिक भयभीत झाले असून प्रशासनाच्या निष्काळजीपणा आणि शून्य कारवाईचा हा परिणाम आहे.
मकर संक्रांती सणाला पतंगबाजीच्या खेळातून सर्वजण आनंद घेतात. मात्र, प्रतिबंधित घातक नायलॉन चायना मांजामुळे सर्वसामान्यांच्या जीवाला मोठा घोर लागला. नायलॉन मांजाला रोखण्यात अपयश आले असून प्रशासनाच्या नाकावर टिचून सर्रास त्याची विक्री व वापर सुरूच आहे. या मांजामुळे शहरात एकाचा बळी गेला, तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत.
पतंगबाजीसाठी मोठ्या प्रमाणात नायलॉन मांजाचा वापर होतो. हा नायलॉन मांजा प्रतिबंधित असतांनाही सर्वत्र तो दिसून येत आहे. प्रशासनाकडून केवळ कारवाईचा देखावा होत असल्याचा आरोप झाला. या नायलॉन मांजाचा वापर नागरिकांच्या जीवावर उठल्याचे विविध घटनांवरून अधोरेखित होते. जुने शहर भागातील गुरुदेव नगर येथे नायलॉन मांजामुळे एका महिलेचा पाय कापल्या गेल्याची दुर्दैवी घटना काल घडली. कलावती मराठे यांच्या पायात नायलॉन मांजा अडकल्याने त्या गंभीर जखमी झाल्या.आहे.उपचारादरम्यान त्यांच्या पायाला चक्क ४५ टाके पडले आहेत.
आज मकर संक्रांतीनिमित्त पतंगबाजीचा जोर चांगलाच वाढला. शहरातील खोलेश्वर भागात व्यावसायिक गणेश श्रीवास्तव आपले दुकान बंद करून घरी जात असतांना वाटेत त्यांच्या डोळ्याला नायलॉन मांजामुळे गंभीर इजा झाली. त्यांना तत्काळ सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार केले जात आहे. प्रशासनाकडून नायलॉन मांजावर कारवाईचा केवळ फार्स ठरल्याचे बोलल्या जात असून संताप व्यक्त केला जात आहे.