अकोला दिव्य : भक्तिमार्गात अनेक अडचणी येतात.या अडचणीचा सामना करतांना अनेक भक्त हे भक्तिमार्ग सोडून जातात.अडचणी मध्ये निरंतर सुरू असलेली भक्ती कमी झाली तर तन्मयता नाहीशी होते.मात्र हे विसरता कामा नये की,भक्तिमार्गात अडचणी ही तुमच्या भक्तीची परीक्षा आहे.यातून तुम्ही भक्ती करीत पुढे गेले तर अशी भक्ती प्रभू स्वीकार करून तुमच्या भक्तीत अडचणी येऊ देत नाहीत. म्हणून कोणतीही अडचणी आल्यात तरी प्रभू भक्ती कदापि सोडू नका, असं आवाहन राधाकृष्ण महाराज यांनी केले.
आदर्श गोसेवा व अनुसंधान प्रकल्पच्या वतीने मुंगीलाल बाजोरिया विद्यालय प्रांगणात सुरू असलेल्या भागवत कथेत आज मंगळवारी कथेचे शष्टम पुष्प संपन्न झाले. यात गोवर्धन पूजा व अन्नकुटचे महात्म्य प्रतिपादित करताना ते म्हणाले की, अडचणींचा सामना करीत असताना केलेली भक्ती उलट सशक्त होते. भक्ती म्हणजे प्रभू विषयीचे उत्कट प्रेम आहे. प्रेम हे कधी क्रोधाचे लक्षण असु शकत नाही. गोपिकांनी भगवंतावर उत्कट असे प्रेम केले.मात्र त्यांचा क्रोध हा स्नेहमय क्रोध होता.
या सत्रात राधाकृष्ण महाराज यांनी अन्नकुटचे महत्व प्रतिपादीत केले. गोकुळात भगवान कृष्णाचे अन्नकुट हे जगाला अन्नाचे महत्व सांगते. प्रत्येकाच्या घरी अन्नकुट नित्याने झाले पाहिजे. हा अन्नकुट उत्सव समाजासाठी उपयुक्त व आवश्यक असल्याचे त्यांनी सांगून गोवर्धन लीला कथन केली. गोवर्धन लिलेच्या माध्यमातून सात दिवस भगवंताचे संपूर्ण गोकुळला दर्शन झाल्याचे सांगितले.
भक्तांच्या जल्लोष पूर्ण सामूहिक गोकुळ नृत्य व महाआरतीने सत्राची समाप्ती झाली. या सत्रात विजय अग्रवाल, नितीन जोशी, संजय अग्रवाल, ब्रिजमोहन चितलांगे, संदीप अग्रवाल, आ.रणधीर सावरकर, डॉ अभय पाटील, प्रशांत देशमुख, डॉ अभय जैन, उमेश बगडीया, आर्कि मनीष भुतडा,अशोक दालमिया, सुभाष ढोले, प्रा विवेक बिडवई, सुभाष लव्हाळे, शिवभगवान भाला, हरिष मानधने, राधेश्याम भन्साली, वृंदा रांदड, कमल किशोर रांदड आदींनी महाराजांचे स्वागत केले.
उद्या बुधवार दिनांक 15 जानेवारी रोजी सकाळी 9 वाजता कथा कीर्तनाची कृष्ण सुदामा मिलन व युवकांना मार्गदर्शन करुन भक्तिमय सांगता होणार असून सुरभी यज्ञ सकाळी 7 ते सकाळी 9 वाजेपर्यत होणार आहे. या पूर्णाहुतीचा भक्तांनी मोठ्या संख्येने लाभ घेण्याचे आवाहन आदर्श गोसेवा व अनुसंधान प्रकल्प व सनातनी समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.
तुला दानास गोभक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
आदर्श गोसेवा अनुसंधान प्रकल्पतर्फे गोमातेच्या पालन पोषणासाठी तुलादान सुरू असून या माध्यमातून गोचाऱ्यास निधी उभारण्यात सर्वांनी खारीचा वाटा उचलला. प्रथम दिनापासूनच तुलादानात गोभक्तांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. या कार्यात जवळपास पाचशे पेक्षा जास्त भक्तांनी तुलादान केले असून संपूर्ण आठवड्यात लाखो रुपये या माध्यमातून गोचाऱ्यासाठी प्राप्त झाले आहेत.आज मकर संक्रांतीच्या पावन पर्वावर एकाच दिवसात तुला दानात तीन लक्ष रुपये संकलित झाले. भाविकांनी या उपक्रमात भरभरून प्रतिसाद दिल्याचे दिसून आले.
राधाकृष्ण महाराज यांच्या श्रीमद्भगवद्गीता श्रवण करताना गोसेवा आणि गोपालनात आपल्या कुटुंबाने खारीचा वाटा उचलावा, अशी मनिषा शहरातील नरेंद्र जोशी यांच्या दिव्यांग मुलाने व्यक्त केली.तेव्हा त्याची ही रास्त अपेक्षा पुर्ण करण्यासाठी आई आणि वडिलांनी तुला दान करुन, त्याच्या वजनाचा गो-चारा देऊन या सत्कार्यात आपलं योगदान दिले.
..