गजानन सोमाणी • एडिटर इन चीफ : ‘नामदेव कीर्तन करी, पुढे देव नाचे पांडुरंग’ असा संतांच्या घरचा कीर्तन महिमा मागील दोन अकोला शहरात सुरू असून, मकर संक्रांतीच्या पावन दिवसांपर्यंत हा विलक्षण अनुभव अनुभवायला मिळणार आहे. कथा, कीर्तन आणि संकीर्तन असा हा त्रिवेणी संगम अकोला शहरातील मुंगीलाल बाजोरिया विद्यालयाच्या प्रांगणात उभारलेल्या गोकुळ धाम येथे तयार झाला असून कडाक्याच्या थंडीत देखील वारकरी संप्रदायासह भाविक-भक्त या संगमात न्हावून निघत आहे.
कीर्तन ही महाराष्ट्रातील अतिशय प्राचीन अशी सांस्कृती असून नवविधा भक्तीमध्ये कीर्तनाचा उल्लेख दुसरी भक्ती म्हणून केला जातो. कीर्तनाचा महिमा ज्ञानेश्वरीच्या नवव्या अध्यायात संत ज्ञानेश्वरांनी सांगितलेला आहे. विष्णुपुराण, स्कंदपुराण, आदित्यपुराण आदी पुराणांमध्ये संकीर्तनाचे उल्लेख आहेत. भागवत संप्रदायी संतांनी कीर्तनाचा महिमा अनेकवार विशद केला आहे.
‘कीर्तन चांग कीर्तन चांग। होय अंग हरिरूप। असं संत तुकारामांनी म्हटलं आहे. तर ‘नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी।’ असं संत नामदेवांनी म्हणून ठेवलंय आणि मुंगीलाल बाजोरिया विद्यालयाच्या प्रांगणात मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या किर्तनात वारकऱ्यांना आणि अकोलेकरांना हा अनुभव येतो आहे.
कीर्तनकार ‘रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी’ या अभंगाने कीर्तनाचा प्रारंभ आणि त्यानंतर विठोबा रखुमाईचा नामघोषात किर्तनकार एखाद्या विषयाला हात घालून जेव्हा किर्तन करतात, ते ऐकून परम सुखाची कारंजी उडतात आणि भक्तीरंगात सगळेचजण देहभान विसरून भुलोकीच स्वर्ग सुखाची प्राप्ती होते. हा सगळं विलक्षण अनुभव घेण्यासाठी पंढरपूर येथील हभप चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या काल शुक्रवारी रात्रीच्या किर्तनात भागवत कथाकार राधाकृष्ण महाराज देखील शेवटच्या क्षणापर्यंत हजर होते.
तुकारामांनी अभंगात सांगितलेच आहे की, तुका म्हणे माथा ठेवील चरणी । होतील पारणी इंद्रियांची ॥ चरणरज वंदिता दोषांचे डोंगर जळतात. नरनारी शुद्ध होतात. म्हणजेच संत व भगवंतांची व्याख्या तुकोबारायांनी आपल्या अभंगात अत्यंत सुंदर व मार्मिकपणे केली आहे. जे सगळ्यांना माहिती असणं आवश्यक आहे ते सांगण्याकरता संत या भूतलावर येतात.तर भगवंत संताच्या रुपाने या भूतलावर येतात. वास्तविक संत व भगवंत हे स्वरूपाने एक असले तरी त्यांच्या कार्याचे स्वरूप हे भिन्न असते. संत व भगवंतात तसे कोणतेच अंतर नसते. ज्ञानोबाराय, तुकोबाराय समवेत सर्व संत हे साक्षात भगवंतच होत. सर्व संतात भेद करता येत नाही. परमात्मा संतांच्या रूपानेच जगत कार्यासाठी येतात.
कथा त्रिवेणी संगम । देव भक्त आणि नाम अशी वारकरी कीर्तनाबाबत संप्रदायामध्ये श्रद्धा असते. वारकरी कीर्तन, हरिदासी कीर्तन अर्थात नारदीय कीर्तन, समर्थ संप्रदायाचं कीर्तन, गाडगे महाराज संप्रदायाचं कीर्तन, असे कीर्तनाचं स्थूल वर्गीकरण करता येतं. हे वर्गीकरण संप्रदायसापेक्ष आहे. वारकरी कीर्तन हे भागवत संप्रदायाचं कीर्तन म्हणून ओळखलं जातं. कीर्तन आणि भजनातून समाज जागृती करण्याची परंपरा आपल्याकडे संत गाडगे महाराज आणि संत तुकडोजी महाराज यांच्यापासून सुरू झाली. पुढे ती परंपरा गयाबाई मनमाडकर आणि तनपुरे महाराजांपर्यंत येऊन स्थिरावली. त्यांच्यानंतर अलीकडच्या काळात पंढरीच्या वारीत कीर्तन आणि भारुडातून प्रदूषण मुक्ती, तसंच पर्यावरण जागृतीचा संदेश देण्याचं काम दिंडीतील किर्तनकार करीत आहे. कीर्तन सेवेतून पर्यावरण जागृतीची मोहीम गेली पंधरा वर्षे राबवली जात आहे.
आज शनिवार 11 जानेवारीला मानवत येथील ह.भ.प. उमेश महाराज दशरथे, रविवार दिनांक 12 जानेवारी रोजी रात्री 7-30 वाजता कीर्तन स्थळी हभप संजय महाराज पाचपोर यांचे कीर्तन होणार असून सोमवार दिनांक 13 जानेवारी रोजी बार्शी येथील हभप अनिल महाराज पाटील यांचे कीर्तन होणार आहे.या कीर्तनाचा भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.