अकोला दिव्य न्यूज : श्रीमद्भगवद्गीता आणि अभंग एकाच नाण्याच्या दोन बाजू असून भारतातल्या सर्व प्रदेशांत, सर्व भाषांत आणि सर्व संप्रदायात किर्तन हा प्रकार आढळतो, तो मुळात अभंगाचेच निरुपण आहे. नवविधा भक्तीपैकी कीर्तन हा दुसरा प्रकार असून वेगवेगळ्या पद्धतीने काव्य, संगीत, अभिनय आणि क्वचित नृत्य यांच्यासह सादर करीत असलेल्या भक्तिरसपुर्ण कथारूप एकपात्री निवेदनाला कीर्तन असे म्हणतात, आणि हे करणाऱ्याला किर्तनकार म्हटले जाते.
महाराष्ट्र ही साधु-संतांची आणि समाज सुधारकांची भुमी असून महाराष्ट्रात किर्तनकारांना साधुसंतांचा ओळीतच पुजनिय स्थान आहे.महाराष्ट्रातील अशा श्रेष्ठ किर्तनकारांच्या किर्तनाचा पहिल्यांदा वारकरी संप्रदायासह सर्वच भाषिक भक्तांना लाभ पदरात पाडून घेता येईल.
शहरातील मुंगीलाल बाजोरिया विद्यालयाच्या प्रांगणात उभारलेल्या ‘गोकुळ धाम’ मध्ये उद्या गुरुवार ९ जानेवारीपासून मकर संक्रांतीला १४ जानेवारीपर्यंत दररोज सायंकाळी ७.३० ते रात्री १० वाजेपर्यंत हरीनाम संकिर्तन होणार आहे. उद्या गुरुवार ९ जानेवारीला जळगाव येथील ह.भ.प.श्री.शिवा महाराज बावस्कर यांच्या किर्तनाने या सोहळ्याला सुरुवात होणार आहे.
शुक्रवार १० जानेवारीला पंढरपूर येथील ह.भ.प. चैतन्य महाराज देगलूरकर, शनिवार ११ जानेवारीला मानवत येथील ह.भ.प. उमेश महाराज दशरथे, रविवार १२ जानेवारीला अकोला येथील ह.भ.प. संजय महाराज पाचपोर, सोमवार १३ जानेवारीला बार्शी येथील ह.भ.प. अनिल महाराज पाटील आणि मंगळवार दि १४ जानेवारीला पंढरपूर येथील अँड. जयवंत महाराज बोधले यांचे किर्तन होणार आहे.
अकोला पंचक्रोशीतील भागवत प्रेमी तसेच वारकरी संप्रदाय आणि भाविक भक्तांसाठी श्रीमद्भगवत कथा व किर्तन श्रवण आणि यासोबतच सुरभी कामधेनू यज्ञ म्हणजे त्रिवेणी संगम झाला आहे. भक्तीरसात न्हावून निघण्याचा हा योग सोडू नका, असं आवाहन आयोजकांनी केले आहे.