अकोला दिव्य न्यूज : BJP MLA Claims About Maharashtra : गेल्या काही महिन्यांत विविध समाजांकडून आरक्षणाची मागणी करण्यात आल्यानंतर महाराष्ट्रातील जातीय समीकरणांची वारंवार चर्चा झाल्याचं पाहायला मिळालं. एकीकडे राजकीय वर्तुळातून मराठा, ओबीसी, धनगर अशा समाजांच्या आरक्षणाबाबत आग्रही भूमिका मांडली जात असताना दुसरीकडे या आरक्षणांसाठी रस्त्यावर उतरून मोठमोठी आंदोलनं उभी राहिल्याचंही दिसून आलं. मात्र, या सगळ्यामध्ये महाराष्ट्र फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारानं चालणारा असून इथे जातीयवादाला थारा नाही अशीही भूमिका मांडली गेली. पण आता खुद्द सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या एका आमदारांनीच महाराष्ट्र पुरोगामी असल्याचे दावे म्हणजे थोतांड असल्याचा दावा केला आहे.
महाराष्ट्र जातीयवादी राज्य हे डोक्यात फिट करून ठेवा
भारतीय जनता पक्षाचे जतमधील नवनिर्वाचित आमदार गोपीचंद पडळकर यांनी एका स्थानिक जाहीर कार्यक्रमात यासंदर्भात केलेलं विधान सध्या चर्चेचा विषय ठरलं आहे. यावेळी त्यांनी पुरोगामी वगैरे चर्चा फक्त थोतांड असल्याचाही दावा केला. मी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करून आपल्या भागासाठी सर्व विभागांचे जास्तीत जास्त पैसे आणेन. त्यामुळे तुम्ही चिंता करू नका. इतर समाजाचे विषय असतील, तर मला सांगा. लोक म्हणतात महाराष्ट्र पुरोगामी राज्य आहे. पण हे सगळं थोतांड आहे. महाराष्ट्र फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांवर चालतो हे फक्त भाषणात सांगण्यापुरतं आहे. हे राज्य प्रचंड जातीयवादी आहे हे डोक्यात फिट करून ठेवा. हे आपण बदलू शकत नाही, असं गोपीचंद पडळकर भाषणात म्हणाले आहेत.
“अपने अपने होते है, पराए अपने नहीं होते”
आपल्याला काम करायचं आहे. जातीजातीतल्या भिंती तोडून सगळ्या लोकांसाठी आपल्याला एकत्र काम करावं लागणार आहे. गावागावांत आपल्याला एकत्र यावं लागणार आहे. वैचारिक पातळीवर आपल्याला एकत्र यावं लागेल. अपने तो अपने होते है, पराए अपने नहीं होते हे ध्यानात ठेवा. माझी सारखी परीक्षा का बघताय? माझी हात जोडून विनंती आहे. माझा फोनच उचलला नाही, बघितलंच नाही वगैरे सांगतात लोक. अरे कुणाकुणाचे फोन उचलू? बहिरा झालो मी आता. किती फोन येतात, असंही पडळकर म्हणाले.