अकोला दिव्य न्यूज : Shyam Benegal Passed Away : भारतीय सिनेसृष्टीत अविस्मरणीय योगदान देणारे आणि ‘मंथन’, ‘अंकुर’, ‘निशांत’, ‘भूमिका’ अशा अनेक समांतर सिनेमांचे निर्माते व दिग्दर्शक श्याम बेनेगल यांनी २३ डिसेंबरला संध्याकाळी अखेरचा श्वास घेतला. मुंबई येथे वोकार्ट हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना प्राणज्योत मालवली. बेनेगल ९० वर्षांचे होते. क्रोनिक किडनीच्या समस्येने ग्रस्त असलेले बेनेगल या आजाराच्या शेवटच्या टप्प्यात पोहोचले होते. एका मनस्वी दिग्दर्शकाच्या निधनाने समांतर सिनेमाचं युग पोरकं झाल्याची भावना आज प्रत्येकाच्या मनात आहे.
समांतर सिनेमा हा श्याम बेनेगल यांचा श्वास
‘अंकुर’, ‘निशांत’, ‘मंथन’, ‘भूमिका’, ‘जुनून’ हे आणि असे अनेक चित्रपट त्यांनी दिले. ‘अंकुर’मुळे हिंदी सिनेसृष्टीला शबाना आझमी नावाची अभिनेत्री मिळाली. समांतर सिनेमा दिग्दर्शित करण्यात त्यांचं खूप मोठं योगदान होतं. ‘अंकुर’ या त्यांच्या पहिल्यावहिल्या सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. तसंच ‘निशांत’, ‘मंथन’, ‘जुनून’, ‘आरोहण’ या चित्रपटांनाही राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आले आहेत.
‘महाभारत’ या संकल्पनेवर त्यांनी दिग्दर्शित केलेला ‘कलयुग’ हा सिनेमा आजही सिनेसृष्टीतला मास्टरपीस मानला जातो. ‘सरदारी बेगम’ हा त्यांचा उर्दू सिनेमाही अनेक कारणांनी चर्चेत राहिला. तर ‘झुबैदा’ हा सिनेमाही चर्चेत होता. ‘नेताजी सुभाषचंद्र बोस द फरगॉटन हिरो’ आणि ‘वेल डन अब्बा’ हे त्यांचे अलिकडचे चर्चेत राहिलेले चित्रपट आहेत. समांतर सिनेमाशी श्याम बेनेगल यांची नाळ जोडली गेली होती. श्याम बेनेगल यांच्या चित्रपटांमधून अनंत नाग, नसीरुद्दीन शाह, ओम पुरी, शबाना आझमी, स्मिता पाटील हे कलाकार घडले.
श्याम बेनेगल यांनी समांतर सिनेमांच्या माध्यमातून भारतीय चित्रपटसृष्टीत मोठं योगदान दिलं. त्यांना त्यांच्या सिनेमांसाठी प्रतिष्ठित दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. तसेच त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत तब्बल १८ राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांसह अनेक पुरस्कार मिळवले होते. त्यांना १९७६ मध्ये पद्मश्री आणि नंतर १९९१ मध्ये भारताचा तिसरा-सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मभूषण देऊन सन्मानित करण्यात आलं होतं.