अकोला दिव्य ऑनलाईन : पश्चिम विदर्भातील पहिली आणि प्रगत तंत्रज्ञानाने अकोला शहरालगत उभारण्यात आलेल्या सर्वात मोठ्या आधुनिक ‘टाऊनशिप’ चे निर्माते व युवा बांधकाम व्यावसायिक सिध्दांत सुनील हातेकर यांच्या कार्य-कर्तृत्वाची दखल घेऊन प्रसार माध्यम क्षेत्रातील लोकप्रिय ‘रेडिओ ऑरेंज’ कडून बांधकाम बिझनेस एक्सलेंस 2024 ‘बकु अवार्ड’ने सन्मानित करण्यात आले. अजरबैजान या देशाची राजधानी असलेल्या बाकू शहरात एका शानदार सोहळ्यात प्रतिष्ठीत मान्यवरांच्या हस्ते सिध्दांत हातेकर यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षात हा सन्मान पटकविणारे ते प्रथम बांधकाम व्यावसायीक आहेत.
अकोला जिल्ह्यातील बांधकाम व्यावसायिक क्षेत्रातील सर्वात जुने आणि ग्राहकांच्या कसोटीवर खरे ठरलेल्या शिल्पकार बिल्डर्स या प्रतिष्ठानचे सिध्दांत हातेकर नवे संचालक असून त्यांनी ‘स्थापत्य अभियंता’ शाखेचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर त्यांचे वडिल सुनील हातेकर यांच्या सोबत या क्षेत्रात काम सुरू केले. वडील सुनील हातेकर यांचा अनुभव आणि नेमक्या मार्गदर्शनाचा लाभ घेत, अल्पावधीत सिध्दांत यांनी या क्षेत्रात भरारी घेतली. अकोला शहरातील खरप रोड भागातील न्यु तापडिया नगर मध्ये तब्बल 238 सदनिका उभारण्याचा प्रकल्पाचा श्रीगणेशा केला.
आज बदलत्या जीवनशैलीमुळे घर खरेदीसाठी ग्राहकांचे बदलते संदर्भ आणि मागणी लक्षात घेऊन, माफक किंमतीत सर्व सुविधांचा समावेश या प्रकल्पात केला. अवघ्या दोन वर्षभरात त्यांनी ‘पवन पार्क’ नावाने हा प्रकल्प साकार करीत सर्वांचं लक्ष वेधून घेतले. सिध्दांत हातेकर यांच्या ‘पवन पार्क’ प्रकल्पाने अकोला जिल्ह्यातील बांधकाम व्यावसायाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.
अकोला येथील या प्रकल्पासोबत पुणे शहरातील गृहनिर्माण क्षेत्रात देखील काही प्रकल्पाला साकार करण्यासाठी आराखडा तयार केला असून लवकरच येथे कामाला सुरुवात होते आहे. माध्यम क्षेत्रातील लोकप्रिय ‘रेडिओ ऑरेंज’ कडून बांधकाम क्षेत्रातील कामाचा आढावा घेताना सिध्दांत यांनी केलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांची या पुरस्कारासाठी निवड केली.
वडिलांच्या प्रदिर्घ अनुभवी मार्गदर्शनात बदलत्या जीवनशैलीमुळे घरांच्या मागणीतील बदलासोबतच ग्राहकांना माफक दरात घर देण्यासाठी योग्य नियोजन केल्याने हे शक्य झाले, असं सिध्दांत हातेकर यांनी सांगितले. त्यांच्या या सन्मानासाठी सर्वंच स्तरातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.