Wednesday, December 18, 2024
HomeUncategorized'वाह उस्ताद वाह’ निःशब्द ! सुप्रसिद्ध तबला वादक झाकीर हुसैन यांचं निधन

‘वाह उस्ताद वाह’ निःशब्द ! सुप्रसिद्ध तबला वादक झाकीर हुसैन यांचं निधन

अकोला दिव्य ऑनलाईन : तबला नसांनसांमध्ये भिनलेला आणि जगभरातील रसिकांच्या हृदयात तबल्यावरची थाप भिनवणारा ख्यातनाम कलावंत झाकीर हुसैन यांची ‘वाह उस्ताद वाह’ म्हणत तबल्यावर लिलया पडणारी थाप शांत झाली ! सुप्रसिद्ध तबला वादक (Zakir Hussain ) यांनी काल रविवार १५ डिसेंबरला मध्यरात्री वयाच्या ७३ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या मागे त्यांची पत्नी आणि दोन मुली असं कुटुंब आहे. झाकीर हुसैन यांना अचानक तब्येत बिघडल्याने सॅनफ्रॅन्सिस्को येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्यावर उपचार सुरु होते, तसंच त्यांची प्रकृती गंभीर आहे असंही कळत होतं. मात्र उपचारांदरम्यान झाकीर हुसैन यांची प्राणज्योत मालवली. गेल्या अनेक वर्षांपासून झाकीर हुसैन यांचं वास्तव्य अमेरिकेतच होतं. झाकीर हुसैन आणि तबला हे समीकरण म्हणजे दिवा आणि ज्योत कशी असते अगदी तसंच होतं. वडील अल्लाह राखा खान यांच्याकडूनच त्यांनी तबलावादनाचे धडे गिरवले होते. मात्र याच अत्यंत विनम्र कलावंताचं निधन झालं आहे.

कोण होते झाकीर हुसैन?
झाकीर हुसैन ( Zakir Hussain ) हे सुप्रसिद्ध तबलावादक अल्लाह राखा खान यांचे पुत्र होते. झाकीर हुसैन यांनी अनेक भारतीय आणि परदेशी चित्रपटांना संगीत दिलं आहे. ‘साझ’ या सिनेमात त्यांनी अभिनयही केला आहे. झाकीर हुसैन यांनी वडील अल्लाह राखा खान यांच्यासह तबला वादनाचे धडे वयाच्या सातव्या वर्षापासून गिरवण्यास सुरुवात केली. तसंच वयाच्या १२ व्या वर्षापासून झाकीर हुसैन देशभरात त्यांनी तबला वादन परफॉर्म करण्यास सुरुवात केली होती.

झाकीर हुसैन यांचा अनेक पुरस्काराने गौरव
१९८८ मध्ये झाकीर हुसैन ( Zakir Hussain ) यांना पद्मश्री, २००२ मध्ये पद्मभूषण, २०२३ मध्ये पद्मविभूषण या पुरस्करांनी गौरवण्यात आलं आहे. तसंच १९९० मध्ये त्यांना संगीत नाटक अकादमीचा संगीत पुरस्कारही मिळाला होता. २००९ मध्ये झाकीर हुसैन ५१ व्या ग्रॅमी पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं. उल्लेखनीय बाब ही आहे की झाकीर हुसैन ( Zakir Hussain ) यांना त्यांच्या कारकिर्दीत ७ वेळा ग्रॅमी पुरस्कारासाठी नामांकन मिळालं होतं त्यापैकी चारवेळा त्यांना या पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं.

झाकीर हुसैन यांच्याबाबत ही माहिती आहे का?
झाकीर हुसैन यांचं खरं आडनाव कुरेशी असं होतं. मात्र त्यांना हुसैन असं आडनाव देण्यात आलं. झाकीर हुसैन यांनी १९८९ या वर्षी हीट अँड डस्ट या सिनेमातून त्यांनी अभिनय केला होता. २०१६ मध्ये झालेल्या ऑल स्टार ग्लोबल कॉन्सर्टमध्ये सहभागी होण्यासाठी अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबाबा यांनी झाकीर हुसैन यांना व्हाईट हाऊसमध्ये आमंत्रित केलं होतं. व्हाईट हाऊसमध्ये कला सादर करणारे झाकीर हुसैन हे पहिले संगीतकार ठरले. झाकीर हुसैन यांनी १९७८ मध्ये इटालियन अमेरिकन कथ्थक डान्सर अँटोनिया मिनेकोला यांच्याशी लग्न केलं. या जोडप्याला दोन मुली आहेत. आता झाकीर हुसैन यांच्यानंतर त्यांच्यामागे त्यांची पत्नी आणि दोन मुली असं कुटुंब आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!