अकोला दिव्य ऑनलाईन : संपूर्ण महाराष्ट्रात एक मानाचे स्थान निर्माण केलेल्या विश्वास करंडक बाल नाट्य महोत्सवाचे आयोजन बुधवार ११ डिसेंबर ते शनिवार १४ डिसेंबर २०२४ या कालावधीत अकोला नगरीत प्रमिलाताई ओक हॉल येथे करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील सर्वात मोठी बाल नाट्य स्पर्धा म्हणून या स्पर्धेने नावलौकिक मिळविला आहे.
विश्वास करंडक स्पर्धेने एक नविन पायंडा पाडण्याचा प्रयत्न केला आहे. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून महोत्सवाचे उद्घाटन दरवर्षी मागील वर्षीच्या उत्कृष्ट बाल कलाकरांच्या हस्ते केले जाते. त्यानुसार या वर्षीच्या महोत्सवाचे उद्घाटन मागील वर्षाची उत्कृष्ट कलाकार कु. उत्तरा पुरकर (आर.डी.जी. पब्लीक स्कूल, अकोला) तसेच राघव गाडगे (एड्युविला पब्लीक स्कूल, पातूर) यांचे हस्ते केले जाईल. या दोघांनीही मागील वर्षीच्या स्पर्धेत सर्वोकृष्ठ अभिनयाचे पारितोषिक मिळविले होते. डॉ. सुचीता पाटेकर शिक्षणाधिकारी माध्यमिक, अकोला या उद्घाटन कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहतील.
स्पर्धेचे उद्घाटन बुधवार दि.११ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता प्रमिलाताई ओक हॉल मध्ये होईल. स्पर्धेची वेळ दररोज सकाळी १० ते सायंकाळी ५ पर्यंत राहील. यावर्षी २९ शाळांमधील विद्यार्थी आपल्या नाट्य कलाकृतीसह या स्पर्धेत सहभागी होत आहेत. बालनाट्य क्षेत्रासाठी प्रतिभा संपन्न व महाराष्ट्राला परिचित धनंजय सरदेशपांडे व यतीन माझीरे हे परिक्षक म्हणून लाभलेले आहेत.
जिल्हाधिकारी यांच्या हस्ते बक्षीस वितरण
सदर महोत्सवाचा बक्षीस वितरण समारंभ शनिवार दि. १४ डिसेंबर २०२४ रोजी दुपारी ३ वाजता प्रमिलाताई ओक हॉलमध्ये जिल्हाधिकारी अजित कुंभार यांचे हस्ते होईल. शिक्षणाधिकारी (माध्यमिक) डॉ. सुचिता पाटेकर याप्रसंगी प्रामुख्याने उपस्थित राहतील. विश्वास करंडक बालनाट्य महोत्सवात सुमारे ६० हजार रुपयांची बक्षीसे देण्यात येणार आहेत. उत्कृष्ट सादरीकरण, दिग्दर्शन, नेपथ्य, प्रकाश योजना, संगीत या सोबतच उत्कृष्ट बाल कलाकार यांना बक्षीसे देण्यात येणार आहेत. नवीन संहिता लेखनासाठी सुध्दा पारितोषिक दिल्या जाणार असून समिक्षणाकरीता सुध्दा पुरस्कार देण्यात येणार आहे. आयोजनाचे यजमान पद गेल्या ६ वर्षांपासून जे.आर.डी. टाटा स्कुल अँड एज्युकेशन लॅब यांच्याकडे असून त्यासाठी आयोजन समितीचे निमंत्रक प्रशांत गावंडे सातत्याने परिश्रम घेत आहेत.
विश्वास करंडक बालनाट्य आयोजन समितीचे अध्यक्ष प्रा. मधु जाधव व प्रसिध्दी प्रमुख म्हणून प्रदीप खाडे हे सातत्याने मार्गदर्शन करीत असतात. या स्पर्धेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यजमान संघास कोणत्याही बक्षिसासाठी पात्र समजण्यात येत नाही, परंतु यजमानचा सहभाग आवश्यक असतो. यावर्षी महोत्सवाचा शुभारंभ आर.डी.जी. पब्लीक स्कुलच्या मला पण बालपणं हवयं या बालनाट्याने होईल. पत्रकार परिषदेला आयोजन समितीचे अध्यक्ष प्रा. मधु जाधव, प्रसिध्दी प्रमुख प्रदीप खाडे व महोत्सवाचे निमंत्रक प्रशांत गावंडे उपस्थित होते.