अकोला दिव्य ऑनलाईन : तब्बल ११ दिवसांनी महायुती सरकारचा अर्थात मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांचा आज गुरुवार दिनांक 5 डिसेंबरला शपथविधी होतं आहे. आझाद मैदान येथे होणाऱ्या शपथविधी सोहळ्यासाठी तीनही पक्षांनी वेगवेगळ्या निमंत्रण पत्रिका छापल्या असून त्यावर उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांचे नाव छापलेले नाही. त्यावरून आता विविध चर्चांना तोंड फुटले आहे. एकनाथ शिंदे हे शपथ घेणार की नाही? यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले.
या विषयावर आता उदय सामंत यांनी आपली भूमिका जाहीर केली असून एकनाथ शिंदे हेच उपमुख्यमंत्री व्हावेत, अशी आमची इच्छा असल्याचे ते म्हणाले. तसेच या विषयाकडे राजकारण म्हणून न पाहता हा विषय आमच्यासाठी भावनिक असल्याचेही ते म्हणाले.
एकनाथ शिंदेंना डावलून कुणी काही करणार असेल तर…
शिवसेनेचे (शिंदे) नेते उदय सामंत म्हणाले, एकनाथ शिंदे यांनी जर उपमुख्यमंत्री पद स्वीकारले नाही आणि त्यांनी ते शिवसेनेच्या इतर नेत्याला दिले तरी आम्ही ते स्वीकारणार नाही, अशी आमची ठाम भूमिका आहे. शिवसेनेकडून कुणाचीही नावे आता माध्यमात येऊ नयेत, अशी आमची अपेक्षा आहे. आमच्या कुणाच्याही मनात या खुर्चीवर बसण्याचा विचार नाही. हा खुलासा करणेही आमच्यासाठी दुर्दैव आहे. एकनाथ शिंदे हेच आमचे नेते आहेत. आमच्या सर्वांचे राजकीय भवितव्य त्यांच्या हातात दिले आहे. त्यांना डावलून कुणी काही करत असेल, तर आम्ही गप्प बसणार नाही.
शिंदेंचे नाव का नाही?
निमंत्रण पत्रिकेवर नाव नसल्याबाबत उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. ते म्हणाले, प्रत्येक पक्षाने आपापल्या निमंत्रण पत्रिका छापून त्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना द्याव्यात. त्याची नोंद पोलीस स्थानकात ठेवावी. असा निर्णय महायुतीच्या बैठकीत झाला होता. राष्ट्रवादी काँग्रेसने जी पत्रिका छापली, त्यात अजित पवार यांचे नाव टाकलेले आहे. तर शिवसेनेने (शिंदे) शासनाच्या निमंत्रण पत्रिकेचा फॉरमॅट घेतला आहे. त्यामुळे यात काही ठरवून झाले आहे, असे आम्हाला वाटत नाही.