Wednesday, December 4, 2024
HomeUncategorizedअकोल्यातील 'हिंदूत्व'चा चेहरा निखळला ! गुरु गाडगीळ यांच निधन :

अकोल्यातील ‘हिंदूत्व’चा चेहरा निखळला ! गुरु गाडगीळ यांच निधन :

अकोला दिव्य ऑनलाईन : अकोला शहर व जिल्ह्यातील प्रखर हिंदुत्ववादी चेहरा, कट्टर सावरकर भक्त आणि ‘हिंदू सेना’ संघटनेचे संस्थापक अध्यक्ष, हिंदू धर्म व संस्कृतीसाठी समर्पित साप्ताहिक ‘जागे व्हा सावधान’ चे संस्थापक संपादक आणि हिंदू ज्ञानपीठ शाळेचे संस्थापक अध्यक्ष आणि धर्मवीर उपाधीने सन्मानित गुरु चंद्रशेखर गाडगीळ यांनी आज रविवार १ डिसेंबर रोजी भल्या पहाटे शेवटचा श्वास घेतला. निधनाच्या वेळी त्यांचे वय ९० वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी आणि मुलगा संग्राम गाडगीळ, सुन, नात नातवंडांसह मोठे आप्त कुटुंब आहे. त्यांच्या निधनाने अकोल्याला एका महान नेतृत्व आणि हिंदुत्ववादी आदर्शाची उणीव भासेल. आपल्या कार्याने व शिकवणीने समाजात चैतन्याची भावना निर्माण करणारे धर्मवीर गाडगीळ अलिकडच्या काही वर्षांपासून वयोमानाने थकल्याने त्यांनी सार्वजनिक जीवनातून निवृत्ती घेतली होती.

धर्मवीर चंद्रशेखर गाडगीळ यांचे जीवन म्हणजे तत्त्वज्ञान,साधना, आणि कार्याचा अनुपम आदर्श होतं. त्यांनी हिंदुत्ववादी विचारांना समाजात प्रबळ केले. हिंदूसेनेला सशक्त आणि प्रभावी संघटना बनवले. त्यांच्या नेतृत्वाने अकोल्याला एक नवी ओळख दिली.त्यांनी स्थापन केलेल्या ‘हिंदू ज्ञानपीठ’च्या माध्यमातून त्यांनी शिक्षण, संस्कृती, आणि समाज उभारणीत महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांच्या मार्गदर्शनाने आणि प्रेरणादायी विचारांनी अनेक तरुणांना दिशा मिळाली. ते केवळ एक नेते नव्हते, तर कट्टर हिंदुत्ववादी तत्त्वनिष्ठ मार्गदर्शक होते.

विदर्भातील मोजक्या वीर सावरकर यांच्या कट्टर समर्थकांपैकी एक कट्टर समर्थक आणि पुणे येथील सावरकर स्मृती प्रतिष्ठानकडून पहिला वीर सावरकर पुरस्कार प्रदान करुन सन्मानित करण्यात आलेले चंद्रशेखर गाडगीळ कधीकाळी या शहरात दरारा राखून होते. पण गुरु गाडगीळ यांनी या माध्यमातून कधीच व्यक्तीगत लाभ पदरात पाडून घेतले नाही. त्याकाळी अकोला येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणेशोत्सवाच्या सांगता सोहळ्याची विदर्भात नवलाई वाटत होती. सार्वजनिक गणेश मुर्ती विसर्जन मिरवणुकीला गाडगीळ यांच्यामुळेच एक वेगळेच वलय होते.

संपूर्ण विदर्भात गुरु या नावाने ओळखले जाणारे गाडगीळ यांनी हिंदू सेनेची पाळेमुळे घट्ट रोवली पण या माध्यमातून कधीच राजकारण केलं नाही. जेमतेम उंची पण मजबूत शरीर यष्टी, भरगच्च दाढी, करारी बाणा, कमरेवर सदैव टांगलेली कट्यार आणि उंच जीवनमूल्ये जपत हिंदू धर्म व संस्कृतीसाठी जनजागृती करणारे चंद्रशेखर गाडगीळ यांना केवळ बघण्यासाठी पंचक्रोशीतील हजारो लोक मिरवणूकीसाठी अकोल्यात येत होते. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने निघणा-या मिरवणुकीत गाडगीळ शेवटपर्यंत फिरत राहतं आणि लोकांना मिरवणुकीत गुरुच्या ‘दांडपट्टा’ या खेळाचे विशेष आकर्षण होते. कालांतराने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळा अध्यक्षपदापासून गाडगीळ दूर झाले आणि या मिरवणुकीला देखील उतरती कळा लागली.

युवा पिढीत कठोर शिस्त आणि मजबूत शरीर संपदा असावी, यासाठी गांधी जवाहर बगीच्या जवळ त्यांनी व्यायाम शाळा सुरु करुन गत काळात शेकडो पठ्ठे तयार केले होते. शिक्षणासोबत हिंदू संस्कृती, संस्कार आणि सणवारांची जुजबी माहिती देण्यासाठी ‘हिंदू ज्ञानपीठ’ या नावाने अकोला व नागपूर येथे प्राथमिक व माध्यमिक शाळा सुरू केली. अत्यंत माफक शुल्कात येथे विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जात होते. आपल्या नीतीमुल्यांसोबत त्यांनीं कधीही कुठेही तडजोड केली नाही. शैक्षणिक शुल्कात ही अवाजवी वाढ केली नाही. काही वर्षांपूर्वी नागपूर येथील शाळा बंद पाडली तर अकोला येथील हिंदू ज्ञानपीठात कॉन्व्हेन्ट संस्कृती नसल्याने अखेर शाळा बंद होण्याच्या मार्गावर आली.

शहरात प्रखर हिंदुत्ववादी संघटना, कवायत शाळा, हिंदुत्ववादी साप्ताहिक आणि शाळा सुरु करुन हिंदू धर्म व संस्कृतीची जोपासना करण्यासाठी सतत झटणारे आणि शेवट पर्यंत आपलं संपूर्ण जीवन यासाठी खर्ची घालणारे गुरू आज अनंताच्या प्रवासाला निघाले. त्यांचा मुलगा संग्राम बाहेरगावाहून अकोल्यासाठी निघाले असून, गुरुंच्या पार्थिवावर उद्या सोमवारी सकाळी अंतिम संस्कार करण्यात येणार असल्याचे, त्यांच्या कुटुंबियांनी सांगितले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!