अकोला दिव्य ऑनलाईन : राज्यातील विधानसभेच्या २८८ जागांसाठी आज, बुधवारी दि.२० नोव्हेंबरला सकाळी ७ वाजतापासून मतदानाची प्रक्रिया सुरू झाली असून राज्यातील एकूण ४ हजार १३६ उमेदवारांचे भवितव्य आज सायंकाळी ६ वाजता ईव्हीएम मशिनमध्ये बंद होणार आहे. आता मतदारराजा आपल्या पसंतीच्या उमेदवाराला विधानसभेत पाठविण्यासाठी सज्ज झाला आहे. सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरूवात झाली असून संपूर्ण मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी, यासाठी निवडणूक आयोग आणि पोलीस यंत्रणा तयार आहे. गेल्या दोन-अडीच वर्षांत राज्यात बदललेली राजकीय समीकरणं पाहता, महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यासाठी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची आहे.
जखमी प्रशांत डिक्कर यांच्यावर अकोल्यात उपचार सुरू
जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचे जन स्वराज्य पक्षाचे उमेदवार प्रशांत डिक्कर यांच्यावर आज पहाटे ५ वाजता शेगाव- मनसगाव रोडवर कालखेड फाट्याजवळ अज्ञातांनी प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली. त्यांना उपचारासाठी अकोला येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघात महाराष्ट्र स्वराज्य पार्टी, स्वाभिमानी शेतकरी संघटना, प्रहार जनशक्ती आणि वामनराव चटप यांची शेतकरी संघटना अशा पक्षांची आघाडी असलेल्या परिवर्तन महाशक्तीचे प्रशांत काशिराम डिक्कर हे अधिकृत उमेदवार आहेत. प्रचारात आघाडी घेतली आहे.शेतकऱ्यांसाठी लढा देणारे अशी प्रशांत डिक्कर यांची ओळख असून जळगाव जामोद मतदारांकडून त्यांचा चांगला प्रतिसाद मिळताना असल्याची मतदारसंघात चर्चा आहे. (सविस्तर बातमी लवकरच)