अकोला दिव्य ऑनलाईन : अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा अँड. प्रकाश आंबेडकर यांनी भाजपचे बंडखोर आणि अपक्ष उमेदवार हरीश भाई आलिमचंदानी यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे.वंचित बहुजन आघाडीच्या पाठींब्याने आलिमचंदानी यांची बाजू अधिक मजबूत झाली असल्याचे त्यांच्या समर्थकांनी सांगितले.
अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातील प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवार डॉ.अशोक ओळंबे पाटील आणि उबाठा शिवसेनेचे बंडखोर राजेश मिश्रा यांनी देखील वंचित बहुजन आघाडीचा पाठींबा मागितला होता.मात्र सर्वांनांच अपेक्षित असल्याने आज सोमवार ११ नोव्हेंबरला अँड. आंबेडकर यांनी त्यांच्या वंचित बहुजन आघाडीचा पाठींबा आलिमचंदानी यांना दिल. या पाठिंब्यावर आलिमचंदानी यांनी अँड.आंबेडकर यांचे आभार मानताना सांगितले की, निवडून आल्यानंतर अँड. आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना अपेक्षित असल्यानुसार ते विकासाची कामे करणार, असं अभिवचन दिले आहे
वंचित बहुजन आघाडीने अधिकृत उमेदवारी दिलेले डॉ. जिशान हुसेन यांनी शेवटच्या दिवशी माघार घेतल्याने वंचितची चांगली कोंडी झाली होती. त्यामुळे ते कोणाला पाठिंबा देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले असतानाच, नरेंद्र मोदी यांच्या अकोल्यातील सभेनंतर आम्ही ठरवू, असे वंचितच्या स्थानिक नेत्यांनी म्हंटले होते. यानुसार आज जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे यांनी अपक्ष उमेदवार हरीश अलीमचंदानी यांना पाठिंबा देत असल्याची अधिकृत घोषणा केली आहे.