Thursday, November 14, 2024
Homeअर्थविषयकमतदार ग्राहक चिंतेत ! कांदा 80 तर लसूण 500 रुपये किलो

मतदार ग्राहक चिंतेत ! कांदा 80 तर लसूण 500 रुपये किलो

अकोला दिव्य ऑनलाईन : महाराष्ट्रातील सत्ता बाजारात सध्या पुढारी दारोदारी हिंडून आपली दुकानदारी कशी चालेल यासाठी दररोज नवीन डाव मांडत आहेत. तर दुसरीकडे बाजारात कांदा आणि लसणाचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे कांदा ८० रुपये किलोवर तर लसूण ४०० रुपये किलोवर गेल्यानं सर्वसामान्य मतदार चिंताक्रांत आहेत. कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये कांदा आणि लसणाची आवक कमी झाल्यामुळे तुटवडा जाणवत आहे. पुढील महिनाभर कांद्याचे आणि तीन–चार महिने लसणाचे वाढ चढेच राहणार आहेत.

दिवाळीनिमित्त नाशिक परिसरात कांद्याची खरेदी–विक्री आठवडाभर बंद होती. त्यामुळे बाजारांत काद्यांचा तुटवडा निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांकडील उन्हाळी कांदा जवळपास संपला आहे. किरकोळ प्रमाणात दोन ते पाच टक्के उन्हाळी कांदा शेतकऱ्यांकडे शिल्लक आहे. खरीप कांद्याची काढणी सुरू असतानाच जोरदार पाऊस झाल्यामुळे कांदा सडला आहे. त्यामुळे खरीप कांद्याच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे.

खरीप कांद्याची नुकतीच आवक सुरू झाली आहे. बाजारात कांद्याचा तुटवडा असतानाच बांगलादेशाने कांद्यावर लागू केलेला ५० टक्के आयात शुल्क १५ जानेवारीपर्यंत शून्य टक्के केला आहे. त्यामुळे बांगलादेशाला अचानक निर्यात वाढली आहे. या सर्वाचा परिणाम म्हणून पुणे मुंबईसह राजधानी दिल्लीत दर्जेदार कांद्याचे दर ८० रुपयांवर गेले आहेत. खरीप हंगामातील नुकताच काढलेला, पाण्याचे प्रमाण जास्त असलेला कांदा ६० रुपये किलो दराने विक्री होत आहे. किरकोळ बाजारात कांदा ६० ते ८० रुपये किलो दराने विक्री होत आहे.

खरीप कांद्याची काढणी सुरू झाली आहे. कांदा हळूहळू बाजारात येऊ लागला आहे. दिवाळीनंतर अद्यापही कृषी उत्पन्न बाजार समितीतील खरेदी – विक्री सुरळित झालेली नाही. त्यामुळे पुढील महिनाभर कांद्याच्या दरात तेजी राहणार आहे. खरिपातील कांद्याची बाजारात आवक सुरू झाल्यानंतर कांद्याच्या दरात काहीसा दिलासा मिळू शकेल, अशी माहिती येथील कांद्याचे व्यापारी अतिष बोराटे यांनी दिली.

किरकोळ बाजारात लसणाचे दर ४०० ते ४५० रुपये किलोंवर गेले आहेत. लसणाचा हंगाम अखेरच्या टप्प्यात असल्यामुळे बाजारात तुटवडा निर्माण झाला आहे. लसणाची रब्बी हंगामात लागवड केली जाते. गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात लसणाचे उत्पादन होते. रब्बी हंगामातील लसणाची लागवड आता सुरू झाली आहे. या लसणाची काढणी फेब्रुवारीपासून सुरू होईल. त्यामुळे पुढील तीन – चार महिने लसणाचे दर तेजीत राहणार आहेत.

बाजारात कांदा आणि लसणाचा तुटवडा आहे. शेतकऱ्यांकडील उन्हाळी कांदा आणि लसूण संपला आहे. खरीप हंगामातील कांद्याची आवक सुरू झाली आहे. त्यामुळे पुढील महिनाभर कांद्याचे दर तेजीत राहतील. राज्याबाहेरून होणारी लसणाची आवक थंडावली आहे. रब्बी हंगामातील नवीन लसूण बाजारात येईपर्यंत लसणाचे दर आवाक्यात येणार नाहीत, अशी माहिती पुणे बाजार समितीतीचे संचालक राजीव शर्मा यांनी दिली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!