अकोला दिव्य ऑनलाईन : विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या तीनही पक्षांमध्ये सर्वाधिक बंडखोरी दिसून आली आहे. त्यातही भाजपामध्ये बंडखोरांची संख्या अधिक आहे. दोनच दिवसांपूर्वी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बंडखोरांवर कारवाई करण्याचे संकेत दिले होते. त्यानुसार आता राज्याच्या ३७ विधानसभा मतदारसंघातील ४० बंडखोरांवर कारवाई करण्यात आली आहे.यामध्ये अमरावती येथील जगदीश गुप्ता, तुषार भारतीय यांचा समावेश आहे. तर हरीश आलिमचंदानी यांनी स्वतः पक्ष सोडला आहे. तेव्हा पक्षाचा आदेश डावलून शिस्तभंग केल्याबद्दल या नेत्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.
४ नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची मुदत होती. भाजपाने अनेक बंडखोरांची समजूत घालून अर्ज मागे घेण्याचा प्रयत्न केला. २९ ऑक्टोबर रोजी जेव्हा उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. तोपर्यंत महायुतीमधील ५० नेत्यांनी बंडाचे निशाण फडकवले होते. त्यापैकी ३६ उमेदवार हे महायुतीचे होते. यातही भाजपाचे सर्वाधिक १९ उमेदवार आहेत, तर त्यापाठोपाठ शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाचे १६ उमेदवार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचा केवळ एकच बंडखोर आहे.
राज्यभरात भाजपा नेत्यांनी अनेक ठिकाणी बंडखोरी केली असून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी होत होती. या नेत्यांवर कारवाई न झाल्यास महायुतीमध्ये चुकीच संदेश जाईल, अशी भीती वाटत असताना आता कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.भाजपाच्या कारवाईनंतर आता एकनाथ शिंदे आणि अजित पवार त्यांच्या पक्षातील बंडखोरावर काय कारवाई करणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
महायुतीकडून ३६ बंडखोर
भाजपा विरुद्ध शिवसेना, ९ मतदारसंघ – ऐरोली, अंधेरी पूर्व, पाचोरा, बेलापूर, फुलंब्री, कल्याण पूर्व, विक्रमगड, सोलापूर शहर शिवसेना विरुद्ध भाजपा, १० मतदारसंघ – मेहकर, बुलढाणा, सावंतवाडी, जालना, पैठण, घनसावंगी, अलिबाग, कर्जत, मिरा-भाईंदर राष्ट्रवादी विरुद्ध शिवेसना, ७ मतदारसंघ – पाथरी, बीड, वाई, अनुशक्तीनगर, देवळाली, दिंडोरी आणि खेड आळंदी. राष्ट्रवादी विरुद्ध भाजपा, ९ मतदारसंघ – अहेरी, अमळनेर, अमरावती, पाथरी, शहापूर, जुन्नर, उदगीर, कळवण, आळंदी. शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी, १ मतदारसंघ – नांदगाव (नाशिक)