अकोला दिव्य ऑनलाईन : अटीतटीच्या अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात अखेरच्या क्षणी वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ.जिशान हुसेन यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने, वंचित बहुजन आघाडीत प्रचंड असंतोष खदखदत असून या नंतर वंचित बहुजन आघाडीच्या मतदारांना नेमकं मतदान करण्यासाठी आवाहन करणे आवश्यक झाले आहे. अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात उमेदवार मैदानात नसल्याने अँड.प्रकाश आंबेडकर कोणाला समर्थन देतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. वंचित बहुजन आघाडीच्या मतदारांनी आपल्याला मतदान करावे, यासाठी तीन्ही अपक्ष उमेदवारांनी अँड.आंबेडकर यांच्याकडे पाठींबा मागितला आहे.
प्राथमिक पातळीवर चर्चा होऊन एका उमेदवारांच्या नावावर सहमती दर्शविली गेली.तर वंचित बहुजन आघाडीकडून आज जारी करण्यात आलेल्या पत्रानंतर अकोल्यात कोणाला पाठिंबा द्यावा हा निर्णय वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा आंबेडकर ९ नोव्हेंबरला जाहीर करण्याची शक्यता असल्याचे सुत्रांनी सांगितले आहे.
अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात कट्टरवाद नको आहे असं प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना सांगितलं आहे. अकोल्याचे वातावरण आपल्याला जातीय दंगलींच्या आगीमध्ये स्वाहा करायचे नाही, असा संदेश आंबेडकरांनी दिल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीच्या एका जबाबदार पदाधिकाऱ्याने दिली.
दरम्यान अकोल्यामधे भाजपचे खासदार ज्ञानेश्वर पाटील यांनी आंबेडकर परिवाराबद्दल वक्तव्य केल्यानंतर त्याला तातडीने वंचित बहुजन आघाडी कडून प्रत्युत्तर देण्यात आलं.अशा स्थितीत इतर घडामोडीवर लक्ष ठेवून येत्या ९ नोव्हेंबरला अथवा त्यानंतर वंचित बहुजन आघाडी आपला निर्णय जाहीर करणार आहे.अशी माहिती हाती आली आहे.
काँग्रेस आणि भाजप या दोन पक्षांच्या उमेदवारांना कोण रोखणार, या दृष्टीने चाचपणी सुरू असून महाराष्ट्रात सध्या सुरू असलेल्या राजकारणाला बघता सगळं काही लागू आहे.