अकोला दिव्य ऑनलाईन : चिखली विधानसभा मतदारसंघातील बहुजन समाज पक्षाचे (बसपा)चे उमेदवार अँड.शंकर शेषराव चव्हाण यांच्यावर हल्ला करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. हल्ल्यात जखमी झालेले अँड. चव्हाण यांना उपचारासाठी चिखली येथीलच एका खाजगी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.
या प्रकरणी चौघा युवकांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे. या हल्ल्यामागे राजकीय अथवा निवडणूक विषयक कारण नसल्याचे वरिष्ठ पोलीस सूत्रांनी सांगितले आहे.मात्र असे असले तरी राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या चिखली शहर आणि मतदारसंघात खळबळ उडाली आहे.
याप्रकरणी बसपाचे उमेदवार शंकर शेषराव चव्हाण ( वय ४० वर्ष राहणार मेहकर फाटा चिखली यांनी स्वतः फिर्याद दिली आहे. फिर्यादी चव्हाण यांच्या तक्रारी वरून चिखली पोलिसांनी हर्षल ओमप्रकाश इंगळे, आकाश इंगळे ,मनोज इंगळे आणि मयूर मुरडकर (सर्व राहणार भानखेड) यांच्या विरुद्ध आज शनिवारी, २ नोव्हेंबर रोजी कारवाई केली आहे.
चौघा आरोपी युवकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता, २०२३ च्या कलम ११८ (१), ११५ (२), ३५२, ३५१ (२) (३), ३२४ (४), ३(५) नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
फिर्यादीनुसार चव्हाण कुटुंबियाचे चिखली -देऊळगाव राजा राज्य मार्गावर हॉटेल शंकर फौजी नावाचा ढाबा आहे. रात्री दीड वाजताच्या सुमारास हे युवक आरडाओरड आणि धामधूम करीत होते. यावेळी फिर्यादी शंकर चव्हाण यांचे वडील शेषराव चव्हाण यांनी त्यांना हटकले.तसेच अपरात्री हॉटेल समोर धिंगाणा करू नका असे म्हटले.
यावेळी चार आरोपीनी शंकर चव्हाण यांना काठी, लोखंडी रॉडने तर त्यांचे वडील शेषराव चव्हाण आणि हॉटेलचे कर्मचारी यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण करुन शिवीगाळ केली. एवढेच नव्हे तर हॉटेलमधील साहित्य आणि पदार्थांचे नुकसान करुन धमक्या दिल्याचे तक्रारीत नमूद आहे.
या खळबळजनक घटनेचा तपास चिखली।पोलीस ठाण्याचे ठाणेदार संग्राम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक शरद भागवतकर करीत आहे.