अकोला दिव्य ऑनलाईन : वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲड. प्रकाश आंबेडकर यांची अँजिओप्लास्टी यशस्वी झाली. त्यांना पुढील २४ तास वैद्यकीय तज्ज्ञांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार आहे, असे पक्षाकडून ‘एक्स’वर पोस्ट करुन सांगण्यात आले होते. आता वंचितचे कार्यकर्ते आणि प्रकाश आंबेडकर यांच्या समर्थकांना दिलासा देणारा ‘बाळासाहेबां’चा फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.
पहिला फोटो समोर
कोरा चहा (ब्लॅक टी), मारी बिस्किटे आणि वर्तमानपत्रे — बाळासाहेब आंबेडकरांनी आपल्या दिवसाची सुरुवात अशी केली. बाळासाहेबांना आज रुग्णालयातील आयसीयूमधून दुसऱ्या विभागात हलवण्यात येणार आहे. आम्ही लवकरच बाळासाहेबांचा एक व्हिडिओ संदेश प्रसिद्ध करणार आहोत, असे एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहे.
वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना गुरुवारी (३१ ऑक्टोबर) पहाटे पुण्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या हृदयात रक्ताची गुठळी झाल्यामुळे त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार करण्यात आले. त्यांची अँजिओग्राफी करण्यात आली होती. यानंतर शुक्रवारी त्यांच्यावर ‘अँजिओप्लास्टी’ करण्यात आली.
प्रकाश आंबेडकर यांची प्रकृती स्थिर असून, हितचिंतक आणि जनतेने दिलेल्या पाठिंब्याबद्दल आणि संदेशांसाठी आंबेडकर कुटुंब आभार मानत आहे,’ असे ‘एक्स’वरील पोस्टमध्ये म्हटले आहे.रेखा ठाकूर यांच्याकडे धुरा
दरम्यान, ‘वंचित’च्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर या निवडणूक समन्वय समिती, जाहीरनामा समिती, माध्यम आणि संशोधन विभाग यांच्या सहकार्याने पुढील काही दिवस वंचित बहुजन आघाडीच्या प्रचाराचे नेतृत्व करणार आहेत.
वंचित स्वबळावर मैदानात
लोकसभा निवडणुकीच्या वेळी महाविकास आघाडीत प्रवेशाच्या चर्चा निष्फळ ठरल्यानंतर वंचित बहुजन आघाडी स्वतंत्र निवडणुकांना सामोरी गेली होती. यंदाही वंचित बहुजन आघाडी स्वबळावर विधानसभेच्या मैदानात उतरली आहे.
दहा उमेदवार याद्यांमधून पक्षाने अनेक जणांना तिकीट देत रिंगणात उतरवले आहे. ते पूर्ण जोमाने निवडणुकांच्या तयारीला लागले असतानाच सर्वेसर्वा बाळासाहेब आंबेडकर यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे ब्रेक लागण्याची भीती होती. मात्र त्यांचा रुग्णालयातील पहिला फोटो समोर आल्यानंतर कार्यकर्त्यांचा जीव भांड्यात पडला आहे.