अकोला दिव्य ऑनलाईन : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत राज्यातील भाजप महायुतीत बंडखोरांचे पीक आले असून, अनेक ठिकाणच्या बंडखोरांना समजावता समजावता ज्येष्ठ नेत्यांच्या तोंडाला फेस आल्याची स्थिती आहे. निवडणूक लढण्याबाबत अतिशय गंभीर असलेले बंडखोर कोणाचेही ऐकत नसल्याचे चित्र बुधवारी दिवसभर बघायला मिळाले.
भाजपच्या उमेदवाराविरुद्ध ज्या भाजपजनांनी बंडखोरी केली आहे असे आणि मित्रपक्षांविरुद्ध उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत अशा दोन्हींसाठी ‘ऑपरेशन समजूत’ राबविली जात आहे. ४ नोव्हेंबर ही उमेदवारी मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. दिवाळी असूनही बंडखोरांची मनधरणी करण्यातच महायुतीच्या नेत्यांचा कस लागेल, असे चित्र आहे.
भाजपसाठी चिंतेची बाब अशी की, संघ परिवार आणि भाजपमध्ये वर्षानुवर्षे सक्रिय असलेल्या नेत्यांनीच भाजपच्या वा महायुतीतील मित्रपक्षांच्या उमेदवारांविरुद्ध बंडाचे निशाण फडकाविले आहे. त्यामुळे महायुतीचे किमान ३५ उमेदवार हे अडचणीत सापडले आहेत.
भाजपच्या मतदारसंघांमध्ये शिंदेसेना वा अजित पवार गटाचे बंडखोर उभे ठाकले आहेत. त्यांना शांत करण्यासाठी कुठे विधान परिषदेचा, तर कुठे पक्षसंघटनेत मोठे पद देण्याचा शब्द दिला जात आहे. ‘आम्ही आधी दहा वर्षे वाट पाहिली, आता पुन्हा पाच वर्षे वाटच पाहायची का’, असा प्रश्न बंडखोरांकडून नेत्यांना केला जात आहे.
…अशी आहे रणनीती
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी फोनवर चर्चा केली आणि बंडखोरांच्या माघारीसाठी काय करायचे याबाबत रणनीती ठरविली.
महायुतीतील बंडखोरी शमविण्याबरोबरच महाविकास आघाडीतील बंडखोर मैदानात कायम राहावेत यासाठीही वरून प्रयत्न सुरू आहेत. भाजपमधील बंडखोरांनी माघार घ्यावी यासाठी स्वत: फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे दिवसभर फोनाफोनी करत होते.
दोघेही मुंबईत होते, काही जणांना त्यांनी मुंबईत बोलावून समजाविण्याचा प्रयत्न केला. या दोघांव्यतिरिक्त बंडोबांना थंडोबा करण्याची जबाबदारी रावसाहेब दानवे, डॉ. भागवत कराड, सुधीर मुनगंटीवार, आशिष शेलार, रवींद्र चव्हाण, श्रीकांत भारतीय यांच्यावर सोपविण्यात आली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.