Wednesday, October 30, 2024
Homeताज्या बातम्यापैशांचा पाऊस ! 15 दिवसात 187 कोटी 88 लाख रुपयांची मालमत्ता जप्त

पैशांचा पाऊस ! 15 दिवसात 187 कोटी 88 लाख रुपयांची मालमत्ता जप्त

अकोला दिव्य ऑनलाईन : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा जोश वाढण्यासोबतच दिवसागणिक राज्यात निवडणुकीसाठी पैशांचा महापूर येतं असल्याचे चित्र प्रशासकीय कारवाईतून दिसून येते. राज्यात १५ ऑक्टोबर रोजी निवडणुकीच्या घोषणेसोबतच आचारसंहिता लागू झाल्याने प्रशासनाने कठोरपणे नाकाबंदी, तपासणी करून बेकायदेशीर कृत्यावर कारवाई करणे सुरू केले.

निवडणुकीची आचारसंहिता लागताच राज्य व केंद्र शासनाच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे ही कारवाई करण्यात येत आहे. त्यात बेकायदा पैसे, दारू, ड्रग्ज व मौल्यवान धातू इत्यादी बाबतीत १५ ते ३० ऑक्टोबर २०२४ पर्यंत एकूण १८७ कोटी ८८ लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली.

निवडणूक आचारसंहितेच्या काळात सजगपणे कार्यरत असलेल्या राज्यातील विविध अंमलबजावणी यंत्रणांनी ही कामगिरी केली आहे. विविध ठिकाणी पोलीस विभाग आणि इतर यंत्रणांनी उभारलेले तपासणी नाके योग्य पद्धतीने कार्यरत असल्यामुळे हे यश मिळाले आहे असं निवडणूक आयोगाने म्हटलं.

 तसेच या कारवाईत प्रामुख्याने राज्य पोलीस विभागाने सुमारे ७५ कोटी रूपये, इन्कमटॅक्स विभागाने सुमारे ६० कोटी रूपये, राज्य उत्पादन शुल्क विभागाने सुमारे ११ कोटी रूपये यांचा प्रामुख्याने समावेश आहे. मतदारांना आचारसंहिता भंगाचा प्रकार आढळल्यास आयोगाच्या ‘सी-व्हिजील’ ॲपवर तक्रार  करता येते. या तक्रारींची माहिती सर्व अंमलबजावणी यंत्रणांना दिली जात असल्याने आवश्यक ठिकाणी जप्तीची कारवाई केली जात आहे असं निवडणूक आयोगाने सांगितले.

मुंबई अहमदाबाद मार्गावरील उधवा येथील चेक पोस्टवर ४ कोटी २५ लाख रुपयांची रोकड पोलिसांनी केली जप्त केल्याची माहिती समोर येत आहे. केंद्रशासित प्रदेशातील सिलवासा येथे एका बँकेतून दुसऱ्या बँकेत ही रोकड नेण्यात येत होती असं सांगण्यात आले. बँकेच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं पोलिसांनी ऐकले परंतु ही रोकड महाराष्ट्र राज्याच्या बॉर्डरवर आली कशी ? असा प्रश्न पालघर पोलिसांनी उपस्थित केला आहे.

सध्या या रोख रकमेची अधिक चौकशी सुरू असल्याची माहिती पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी दिली. निवडणुकीची घोषणा झाल्यापासून राज्यात विविध ठिकाणी रोकड, दारू जप्त करण्यात येत आहे. याआधी पुणे बंगळुरू हायवेवर खेड शिवापूर टोल नाक्याजवळ खासगी कार पोलिसांनी अडवली. त्यावेळी या कारमधून पोलिसांनी जवळपास ५ कोटींची रक्कम जप्त केली होती. 
 

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!