अकोला दिव्य ऑनलाईन : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बंडात सहभागी होणारे पालघरचे आमदार श्रीनिवास वनगा यांना उमेदवारी न दिल्याने ते टोकाचा निर्णय घेण्याच्या विचारात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पालघरमध्ये विद्यमान आमदार असलेले श्रीनिवास वनगा यांचे तिकिट कापून माजी खासदार राजेंद्र गावित यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र त्यानंतर श्रीनिवास वनगा यांना धक्का बसला आहे. ते आत्महत्या करण्याचा विचार करतायेत असा खळबळजनक दावा श्रीनिवास वनगा यांची पत्नी आणि आईने केला आहे.
याबाबत श्रीनिवास यांच्या पत्नी सूमन वनगा म्हणाल्या की, एकनाथ शिंदे यांनी आश्वासन दिलं होते, कुठल्याही आमदाराला घरी बसवणार नाही. प्रत्येकाला निवडून आणू. परंतु तो शब्द पाळला नाही. कालपासून श्रीनिवास वनगा यांनी जेवण सोडले आहे. कुणाशीही बोलत नाही. आत्महत्या करणार असेच बोलतायेत. उद्धव ठाकरे माझ्यासाठी देव होते, मी चुकीचं वागलो. एकनाथ शिंदेंवर मी विश्वास ठेवला, पण त्यांचा घात झाला. माझ्या नवऱ्याचं काय चुकलं असा सवाल त्यांनी विचारला आहे. तर माझ्या पोराने अन्नपाणी सोडलं, त्याच्या जीवाचं काही बरंवाईट झालं तर आम्ही काय करायचं..? असं श्रीनिवास वगना यांच्या आईने भावनिक प्रतिक्रिया माध्यमांसमोर दिली आहे.
गावितांचे पक्षांतरं
पालघर विधानसभा मतदारसंघात राजेंद्र गावित यांनी काँग्रेस तिकिटावर आमदार होते. आघाडी शासन काळात त्यांनी राज्यमंत्रिपदही भूषवले आहे. परंतु त्यानंतर भाजपात जाऊन त्यांनी लोकसभा लढवली. भाजपात निवडून आले. त्यानंतर भाजपा, शिवसेना, बंडानंतर एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि लोकसभेपूर्वी भाजपा आणि आता विधानसभेपूर्वी पुन्हा शिंदेची शिवसेना असं पक्षांतर करून त्यांना पालघर विधानसभेची उमेदवारी देण्यात आली आहे.
दरम्यान, महायुतीच्या जागावाटपात सर्वाधिक चर्चा पालघर मतदारसंघाबाबत झाली. पालघरची जागा मिळावी यासाठी शिवसेना आणि भाजपात रस्सीखेच होती. आता पालघर विधानसभा शिवसेनेला सोडण्यात आली आहे. २०१९ च्या लोकसभेवेळी भाजपाने श्रीनिवास वनगा यांच्यासाठी ही जागा उद्धव ठाकरेंना सोडली होती. श्रीनिवास वनगा हे भाजपाचे माजी खासदार दिवंगत चिंतामण वनगा यांचे सुपुत्र आहेत.
https://www.akoladivya.com/maharashtra/maharashtra-assembly-election-2024-srinivasa-vanga-is-very-upset-for-not-getting-candidature-in-palghar-constituency-by-cm-eknath-shinde-shiv-sena