Friday, November 22, 2024
Homeराजकारण'शिंदेशाही' मध्ये घराणेशाही वरचढ ! नेत्यांचे मुलं, भाऊ व पत्नीला उमेदवारी

‘शिंदेशाही’ मध्ये घराणेशाही वरचढ ! नेत्यांचे मुलं, भाऊ व पत्नीला उमेदवारी

अकोला दिव्य ऑनलाईन : एनडीएचे आणि महाराष्ट्रात महायुतीचे नेते विरोधी पक्षांवर सातत्याने घाराणेशाहीचे आरोप करत असतानाच भाजपासह त्यांच्या मित्रपक्षांमध्ये देखील घराणेशाही पाहायला मिळत आहे. शिवसेनेने (शिंदे) महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठीच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत एकूण ४५ नावं आहेत. मंत्री दादा भुसे, गुलाबराव पाटील, उदय सामंत यांच्यासह स्वतःचीही उमेदवारी एकनाथ शिंदे यांनी जाहीर केली आहे. शिंदेंच्या पक्षाने विधानसभा निवडणुकीसाठी ४५ उमेदवारांची घोषणा केली असून यामध्ये अनेक असे चेहरे आहेत ज्यांचे वडील, पती अथवा भाऊ विद्यमान आमदार किंवा माजी मंत्री आहेत.

शिंदेंच्या पक्षाने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीत घराणेशाही पाहायला मिळत आहे. या पक्षाने अनेक मतदारसंघांमध्ये नव्या व तरुण उमेदवारांऐवजी प्रस्थापित नेत्यांच्या नातेवाईकांना उमेदवारी दिली आहे. एरंडोल, दर्यापूर, पैठण, जोगेश्वरी पूर्व, राजापूर व खानापूर मतदारसंघातून नेत्यांचे नातेवाईक निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

आमदार-खासदारपुत्रांना निवडणुकीचं तिकीट
अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर विधानसभा मतदारसघातून शिवसेना (शिंदे) नेते आनंदराव अडसूळ यांचे पुत्र अभिजीत अडसूळ यांना तर, एरंडोलमधूल अमोल चिमणराव पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. माजी मंत्री संदीपान भुमरे हे आता छत्रपती संभाजीनगरचे (औरंगाबाद) खासदार असल्याने पैठण विधानसभा मतदारसंघातून त्यांचा मुलगा विलास भुमरे आणि सांगलीच्या खानापूरमधून अनिल बाबर यांचे पूत्र सुहास बाबर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

मंत्र्याच्या भावाला संधी
शिवसेनेने मंत्री उदय सामंत यांना रत्नागिरीतून तर त्यांच्या भावाला म्हणजेच किरण सामंत यांना राजापूरमधून विधानसभेचं तिकीट दिलं आहे. दरम्यान, दापोलीमधून शिवसेनेने (शिंदे) पुन्हा एकदा आमदार योगेश कदम यांना उमेदवारी दिली आहे. योगेश कदम यांचे वडील रामदास कदम हे पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत.

मुंबईत रवींद्र वायकरांच्या पत्नीला उमेदवारी
शिंदेंच्या पक्षात मुंबईतही घराणेशाही पाहायला मिळत आहे. माजी मंत्री रवींद्र वायकर हे आता वायव्य मुंबईचे खासदार झाले आहेत. त्यामुळे त्यांच्या विधानसभा मतदारसंघातून म्हणजेच जोगेश्वरी पूर्वमधून त्यांच्या पत्नीला म्हणजेच मनिषा वायकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या मतदारसंघासाठी भाजपा व शिवसेनेत (शिंदे) बरीच घासाघीस झाली. अखेर शिंदेंनी मात्र या जागेवरील दावा सोडला नाही. त्यामुळे जागावाटपात ही जागा शिंदेंच्या शिवसेनेला सुटली आणि त्यांनी येथून वायकरांच्या पत्नीला विधानसभेच्या रिंगणात उतरवलं आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!