गजानन सोमाणी : आश्विन पौर्णिमा ही कोजागरी पौर्णिमा किंवा शरद पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. यास ‘माडी पौर्णिमा’ असेही म्हणतात. ही शरद ऋतूतील आश्विन महिन्यात येते. यंदा ही आश्विन पौर्णिमा आज बुधवार १६ ऑक्टोबर रोजी साजरी केली जात आहे. असे मानले जाते की शरद पौर्णिमेच्या रात्री चंद्राच्या किरणांनी अमृत वर्षाव केला जातो. म्हणूनच या दिवशी भारतात खीर बनवण्याची आणि रात्रभर चंद्राच्या प्रकाशात खीर ठेवण्याची परंपरा रुढ झाली आहे.
ज्योतिषशास्त्रानुसार, संपूर्ण वर्षात फक्त या दिवशी चंद्र सोळा कलांनी भरलेला असतो आणि पृथ्वीवर अमृत वर्षाव करतो. एका अभ्यासानुसार, शरद पौर्णिमेच्या रात्री मध्यरात्री 10 ते 12 दरम्यान कमी कपड्यांमध्ये फिरणाऱ्या व्यक्तीला ऊर्जा मिळते. शरद पौर्णिमेला संपूर्ण रात्र चांदण्याखाली खीर ठेवणे फायदेशीर मानले जाते. यानुसार दुधात लैक्टिक अँसिड आणि अमृत घटक असतात. हे रोग प्रतिकारशक्ती मजबूत करते आणि व्हायरस शरीरापासून दूर ठेवते.पौराणिक कथानुसार, श्री कृष्णाचा जन्म 16 कलांनी झाला होता. तेव्हा असेही म्हटले जाते की, ज्या व्यक्तीला १६ कलांनी संपन्न केले जाते त्याला सर्वोत्तम मानले जाते.
शरद पौर्णिमेला धार्मिक दृष्टिकोनातून शरद पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मीची पूजा केली जाते. असे मानले जाते की या दिवशी देवी लक्ष्मी अवतरली होती. या दिवशीच्या व्रताला ‘कोजागरव्रत’ म्हणतात. दिवसा उपवास करून रात्री लक्ष्मी व ऐरावतारूढ इंद्र यांची पूजा करावी; या पूजेनंतर रात्री चंद्राला आटीव दूधाचा नैवेद्य दाखवायचा असतो. दूध आटवून त्यात केशर, पिस्ते, बदाम, चारोळ्या, वेलदोडे, जायफळ वगैरे गोष्टी घालून, तसेच साखर घालून, नैवेद्य दाखविला जातो. देव व पितर यांना नारळाचे पाणी व पोहे समर्पण करावेत तसेच ते आप्तेष्टांसह स्वतःही सेवन करावेत. उत्तररात्रीपर्यंत जागरण केले जाते.
अशी आख्यायिका सांगतात की या दिवशी उत्तररात्री साक्षात लक्ष्मी चंद्रमंडळातून पृथ्वीवर उतरते व लक्ष्मीदेवी येऊन (संस्कृतमध्ये) ‘को जागर्ति’ (म्हणजे ‘कोण जागत आहे’) असे विचारते, म्हणून या दिवसाला ‘कोजागरी पौर्णिमा’ म्हणतात.या दिवशी लक्ष्मीच्या स्वागतार्थ रात्री रस्ते, घरे, मंदिरे, उद्याने, घाट इतै ठिकाणी असंख्य दीप लावावेत.
( टीप: थोरामोठ्यांकडून ऐकून असलेल्या माहितीच्या आधारे हा लेखनप्रपंच आहे. प्रत्येकाच्या श्रध्देचा भाग आहे. म्हणून हे करावे, हा हेतू नाही.आमची जबाबदारीही नाही.)