अकोला दिव्य ऑनलाईन : टाटा उद्योग समुहातील ‘रॅलिज इंडिया’ मागील २९ वर्षांपासून अकोला एमआयडीसीत कार्यान्वित असून अप्पु चौकातील मुख्य प्रवेशद्वाराला भारतातील उद्योग क्षेत्राचे पितामह आणि थोर समाजसेवी रतन टाटा यांचे नाव देण्यात यावे, अशी एमआयडीसीतील सर्व उद्योजकांची मनस्वी भावना वजा मागणी आहे. तेव्हा तातडीने ही मागणी मान्य करून, नामकरण केले तर ती ख-या अर्थाने रतन टाटा यांना आदरांजली वाहण्यात येईल. असा प्रस्ताव अकोला इंडस्ट्रीज असोसिएशनच्या सभेत मंजूर करण्यात आला आहे.
दरम्यान याप्रकरणी तातडीने कारवाई व्हावी यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन वजा पत्र पाठविण्यात आले आहे. आपल्या दुरदर्शी नेतृत्व व निस्वार्थ भावनेने संपूर्ण जगात भारताचे नाव शिखरावर स्थापित केले आहे. त्यांच्या नावाने या प्रवेशद्वाराचे नामकरण केल्यास उद्योग जगत व सामाजिक क्षेत्रात सन्मानाचे प्रतिक होईल आणि नवीन पिढीला प्रेरणादायी ठरेल, असं असोसिएशनचे अध्यक्ष मनोज खंडेलवाल आणि मानद सचिव नितीन बियाणी यांनी पत्रात नमूद केले आहे.
अकोला इंडस्ट्रीज असोसिएशनच्या वतीने आज सदस्यांची सभा घेऊन रतन टाटा यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. विशेष म्हणजे टाटा उद्योग समुहातील रॅलीज इंडिया अकोला एमआयडीसीत कार्यान्वित असून ते असोसिएशनचे सदस्य आहेत. अकोला इंडस्ट्रीज असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष स्व.भिमराव धोत्रे यांनी सन १९६० मध्ये अकोला येथील भेटी दरम्यान रतन टाटा यांची भेट घेतली होती. यावेळी अकोला इंडस्ट्रीज असोसिएशनच्या सर्व सदस्यांनी विन्रम अभिवादन करून आदरांजली अर्पित केली.