गजानन सोमाणी • एडिटर इन चीफ : भारताची अर्थव्यवस्था ऐतिहासिक झेप घेण्याच्या उंबरठ्यावर उभी असताना, पद्मविभूषण भारताचे नामवंत उद्योगपती आणि टाटा सन्सचे माजी चेअरमन रतन टाटा यांच निधन सर्वांच्या मनाला चटका लावून गेले आहे. संपूर्ण देश दुःखाच्या सागरात बुडाला आहे. रतन टाटा यांची अनुपस्थिती स्वीकरताच येत नाहीय. रतन टाटा यांच्या जीवनाचा आणि कार्याचा भारतीय अर्थव्यवस्थेशी खूप संबंध असल्याने या वेळी त्यांचे मार्गदर्शन बहुमोल ठरले असते. एकमेव रतन टाटा असे व्यापारी होते, ज्यांच्यासाठी आर्थिक संपत्ती आणि यश हे जागतिक समुदायाच्या सेवेसाठी सर्वात जास्त उपयुक्त होते. त्यांच्या दूरदृष्टी व नेतृत्वाने केवळ टाटा समूहच नव्हे तर भारतीय उद्योगक्षेत्रालाही एक आकार दिला आहे.
एक दूरदर्शी व्यापारी नेतृत्त्व, एक दयाळू व्यक्तीमत्त्व आणि एक विलक्षण माणूस होते, रतन टाटा ! भारतातील सर्वात जुन्या आणि प्रतिष्ठित व्यावसायिक घराण्यांना स्थिर नेतृत्व देताना त्यांचे योगदान बोर्डरूमच्या पलीकडे गेले. नम्रता, दयाळूपणा व आपल्या समाजाला अधिक चांगले बनविण्याच्या अतूट बांधिलकीमुळेच रतन टाटांमध्ये अलौकिक शक्ती निर्माण झाली होती. असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. रतन टाटा यांच्या सर्वात अनोख्या पैलूंपैकी एक म्हणजे मोठी स्वप्ने पाहण्याची आवड आणि यासाठी देहभान विसरून ते स्वप्न रतन टाटा यांनी साकार करुन दाखवले आहेत. ‘नॅनो कार’ हे टाटा यांनी साकार केलेल्या स्वप्नांचं एक जिवंत उदाहरण आहे. स्वप्न साकार करुन देखील त्यांनी नम्रता सोडली नाही. आर्थिक संकटात सापडलेला फोर्ड कार उद्योग समुह विकत घेऊन, त्यांनी कर्तृत्वाने चोख उत्तर दिले. यामुळेच रतन टाटा अद्वितीय होते. व्यवसायातील धाडसी निर्णय घेत, टाटा समुहाला एका नवीन उंचीवर घेऊन जात असतानाच शिक्षण, आरोग्यसेवा, स्वच्छता, प्राणी कल्याण यासारख्या अनेक कारणांमध्ये ते आघाडीवर होते.
टाटा यांचे परोपकार आणि समाजाच्या विकासासाठीचे समर्पण लाखो लोकांच्या जीवनाला स्पर्शून गेले आहे. शिक्षणापासून ते आरोग्यसेवेपर्यंत त्यांचे उपक्रम खोलवर रुजले आहेत. याचा फायदा येणाऱ्या पिढ्यांना होईल. प्रत्येकाबरोबर नम्रतेने संवाद साधत, आपल्या जीवनाची तत्वे अतिशय उत्कटतेने जपण्याचा रतन टाटा सातत्याने प्रयत्न करत असे. त्यांची कल्पकता आणि परोपकार यांचा वारसा कायमच पुढच्या पिढ्यांना प्रेरणा देणारा असेल.
रतन टाटा यांच संपूर्ण जीवन हे आपल्या सर्वांसाठी कायमच प्रेरणादायी असेल आणि ते आपल्या मनात कायम राहतील. टाटा खरोखरच असामान्य नेतृत्व होते. त्यांच्या अतुलनीय योगदानामुळे केवळ टाटा समूहच नाही तर आपल्या राष्ट्राची रचना देखील घडली आहे. लाखो लोकांचे मार्गदर्शक आणि मित्र होते. उत्कृष्टता, एकात्मता आणि नवकल्पना यांच्या अतूट बांधिलकीसह त्यांनी जागतिक छाप सोडली आहे. आज भारताने खरे रत्न म्हणजेच, रतन टाटा यांना गमावले आहे.
आज आम्ही रतन नवल टाटा यांना निरोप देत आहोत. मात्र त्यांचे संपूर्ण जीवन हे आपल्या सर्वांसाठी कायमच प्रेरणादायी असेल आणि ते आपल्या मनात कायम राहतील. कारण महापुरुष कधीच मरत नाहीत.