अकोला दिव्य ऑनलाईन : पुण्यातील भाजपाचे कार्यकर्ते मयुर मुंडे यांनी २०२१ साली पंतप्रधान मोदी यांना देवाचा दर्जा देत चक्क ‘मोदी मंदिरा’ची उभारणी केली होती. हे मंदिर त्यावेळी चर्चेचा विषय ठरले होते. दरम्यान, याच मयुर मुंडे यांनी आता भाजपाला सोडचिट्ठी देत पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना पत्र लिहित त्यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याने म्हटलं आहे. तसेच या पत्रात त्यांनी राजीनामा देण्यामागची कारणंदेखील नमूद केली आहेत.मयुर मुंडे यांनी पत्रात नेमकं काय म्हटलं आहे?
मी मागील अनेक वर्षांपासून भाजपाचा निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून काम करत आलो आहे. मी औंध पुणे वार्ड अध्यक्षांपासून ते छत्रपती शिवाजीनगर मतदारसंघाचा युवा मार्चा उपाध्यक्ष पदापर्यंत पक्ष संघटनेचे काम अत्यंत निष्ठेने केलं आहे. पण भाजपामध्ये गेल्या काही वर्षांपासून निष्ठवंत वगळून बाहेरील विष्ठेला जास्त महत्त्व दिलं जाते आहे. त्यामुळे मी माझ्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देतो आहे, असं त्यांनी या पत्रात म्हटलं आहे.
राजीनामा देण्यामागे सांगितली ‘ही’ कारणं
पुढे या पत्रात त्यांनी राजीनामा देण्यामागची कारणंदेखील नमूद केली आहेत. भाजपामध्ये स्थानिक आमदाराच्या मर्जीने आणि शिफासरीने संघटनेतील पद वाटप होत आहेत. निष्ठावंत वगळून मर्जीतील बाहेरून भरती केलेल्या ठेकेदारांना ही पदं दिली जात आहेत. तसेच माजी पदाधिकाऱ्यांना अपमानिक केलं जात आहे. त्यांना बैठकीला बोलवण्यात येत नाही. यामुळे पक्षाचा तसेच विधानसभा मतदारसंघाचा विकास खुंटला आहे. या कारणांमुळे मी माझ्या सर्व पदांसह प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे, असं त्यांनी सांगितले आहे. तसेच जनतेच्या सेवासाठी सार्वजनिक क्षेत्रात सदैव सक्रीय राहणार असल्याचंही मुंडे यांनी स्पष्ट केलं.