अकोला दिव्य ऑनलाईन : पितृपक्षाच्या समाप्तीनंतर आज गुरुवार दि.३ ऑक्टोबरपासून अर्थात आश्विन शुद्ध प्रतिपदा ते आश्विन शुद्ध नवमी या काळात आदिशक्तीचा जागर करणाऱ्या शारदीय नवरात्र उत्सवाला प्रारंभ झाला असून या काळात देवीची उपासना केली जाते. आजपासून प्रारंभ झालेला नवरात्रोत्सवासाठी शहरातील सर्व देवींची मंदिरे सज्ज झाली असून, अकोला शहरासह जिल्ह्यातील सर्वच देवी मंदिरांमध्ये आज पहाटेपासून मुहुर्तावर पारंपरिक पद्धतीने घटस्थापना होऊन , विजया दशमीपर्यंत ‘आदी माय’ चे मंदिर दिवसभर भाविकांसाठी खुली राहणार आहेत.
नवरात्रच्या आदल्या दिवशी शहरातील बागेची देवी ( रिझर्व्ह माता), राणी सती दादी मंदिर, न्यू राधाकिसन प्लॉटमधील कालिंका माता, जुने शहरातील हरिहर पेठेची सप्तश्रृंगी देवी, जुने शहरातील जागेश्वरी माता, राजेश्वर मंदिरात अंबिका माता तसेच अक्कलकोट माता, शितला माता, डाबकी रोड भागातील रेणुका देवी, तोष्णीवाल प्लॉटमध्ये तुळजाभवानी मातेच्या मंदिरासह गुलजार पुरा, खोलेश्वर, अकोट फाईल, रामदास पेठ इत्यादी भागातील देवीची मंदिरे व परिसराची रंगरंगोटी, विद्युत रोषणाईची कामे रात्री उशिरापर्यंत पुर्ण करीत पहाटेच्या पहिल्या मुहूर्तावर घटस्थापना करुन, ‘आदिमाया आदिशक्ती’ आणि ‘उदो ग अंबे’ च्या जयघोषात शक्तिपीठात शक्तीची उपासना सुरू झाली.
पहिल्या दिवसापासून सकाळीच मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येत असल्याचे मंदिरांमध्ये हळूहळू भाविकांची गर्दी वाढत चालली होती. काही मंदिर व्यवस्थापकांनी सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्हींच्या वापरावरही भर दिल्याचे यंदा दिसून आले आहे. नवरात्रोत्सवाची लगबग असताना, दरवर्षी प्रमाणे यंदाही अकोला शहरातील बंगाली बांधवांच्या संस्थेनेही स्वराज्य भवनाच्या प्रांगणात बंगाली संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या दुर्गामाता उत्सवाच्या कामाला सुरुवात केली आहे.
अकोला ग्रामदेवता रिझर्व्ह माता मंदिरामध्ये गुरुवारी पहाटे सहा वाजता घटस्थापना होऊन घटस्थापनेनंतर भाविकांच्या दर्शनासाठी रात्रीला उशिरा मंदिर खुले राहणार आहे. नवसाला पावणारी देवी म्हणून या देवीची मान्यता असून शहरातील जुन्या पिढीतील देवी भक्त आणि शक्ती उपासकांची सगळ्यात अगोदर बागेची देवी/ रिझर्व्ह माता मंदिरात जाऊन दर्शन घेण्याची परंपरा कायम राखली आहे.