Monday, November 25, 2024
Homeताज्या घडामोडीअकोल्याचे सुपुत्र आणि दबंग आयपीएस शिवदीप लांडे यांचा तडकाफडकी राजीनामा !

अकोल्याचे सुपुत्र आणि दबंग आयपीएस शिवदीप लांडे यांचा तडकाफडकी राजीनामा !

अकोला दिव्य ऑनलाईन : अकोल्याचे सुपुत्र व मराठमोळे डॅशिंग आयपीएस ऑफिसर शिवदीप लांडे यांनी अचानक आपल्या नोकरीचा, भारतीय पोलीस सेवेचा राजीनामा दिला आहे. लांडे यांनी राजीनामा दिल्याने बिहार, महाराष्ट्रच नाही तर देशभरात चर्चा सुरु झाल्या आहेत. बिहारचे सिंघम म्हणून प्रसिद्ध असलेल्या शिवदीप लांडे यांच्या व्हेरिफाईड सोशल मीडिया अकाउंटवरून ही घोषणा करण्यात आल्याने पोलीस दलातही खळबळ उडाली आहे. दोन आठवड्यांपूर्वी त्यांनी पूर्णिया आयजी पदाची जबाबदारी स्वीकारली होती. यानंतर लगेचच त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला आहे. तिरहुतसारख्या मोठ्या भागातून पूर्णियाला पाठवल्याने ते नाराज होते अशी चर्चा आहे. काही दिवसांपूर्वी लेडी सिंघम म्हणून प्रसिद्ध असलेल्या आयपीएस अधिकारी काम्या मिश्रा यांनीही वैयक्तिक कारणांमुळे राजीनामा दिला होता.

आयजी कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधताना लांडे म्हणाले की, राजीनाम्याची बातमी खरी आहे. मी वैयक्तिक कारणांमुळे भारतीय पोलीस सेवेचा राजीनामा दिला आहे.

सोशल मिडियावरील पोस्टमध्ये त्यांनी आपण बिहारमध्येच राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. ”गेली 18 वर्षे शासकीय पदावर काम केल्यानंतर आज मी या पदाचा राजीनामा दिला आहे. एवढ्या वर्षांत मी बिहारला माझ्या आणि माझ्या कुटुंबापेक्षा जास्त मानले आहे. माझ्या सेवेत काही चूक झाली असेल तर माफ करावे. मी यापुढे बिहारमध्येच राहणार आहे. बिहारच माझी कर्मभूमी असेल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील पारस गावाचे लांडे हे सुपूत्र आहेत. त्यांनी तिरहुत विभाग ( मुझफ्फरपूर ) कोसी विभागाचे उपमहानिरीक्षक आणि बिहारमधील अररिया, पूर्णिया आणि मुंगेर जिल्ह्यांमध्ये पोलीस अधीक्षक म्हणून काम केले आहे. छेडछाड करणाऱ्यांवर कडक कारवाई केल्यामुळे लांडे लोकप्रिय झाले होते. 

निवडणूक लढणार? 

महाराष्ट्रात निवडणुकीचे वारे सुरु आहेत, याच्या तोंडावरच शिवदीप लांडे यांनी राजीनामा दिल्याने ते निवडणूक लढविणार का याची चर्चा होण्याची शक्यता आहे. अशातच पुढील वर्षी बिहारमध्येही निवडणूक आहे, यामुळेही ही चर्चा सुरु होण्याची शक्यता आहे. यातच त्यांनी बिहारमध्येच राहण्याचे जाहीर केले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!