अकोला दिव्य न्युज ब्युरो : जेसीआय अकोला सिटीचे भूतपूर्व अध्याय अध्यक्ष, माजी राष्ट्रीय कोषाध्यक्ष आणि सनदी लेखापाल मनोज चांडक यांच्या 50 व्या जन्मदिवसाच्या निमित्ताने एचडीएफसी बॅंक आणि महाबीज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान शिबिरात 51 जणांनी रक्तदान करुन, चांडक यांना वाढदिवसाची समाजोपयोगी भेट दिली. जेसीआय अकोला सिटीच्या वर्तमान कार्यकारिणीकडून त्यांचे आधारस्तंभ सीए चांडक यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबीराचे उद्घाटन महाबीजचे मुख्यव्यवस्थापक सचिन कलंत्रे यांच्या हस्ते करण्यात आले.
जेसीआय अकोला सिटीच्या अध्याय अध्यक्ष दीपक सिंघानिया यांनी रक्ताच्या किमान 50 बॉटल जमा करण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. एचडीएफसी बॅंकेच्या हर्षाली चांडक सोबत यासाठी अथक परिश्रम करून शिबिरात जमा झालेल्या रक्ताच्या 51 बॉटल साईजीवन ब्लड बॅंकेला सुपुर्द केल्या. महाबीजच्या कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन रक्तदान केले. तसेच जीसीआय अकोला सिटी सदस्य आणि मनोज चांडक यांच्या हितचिंतकांनी रक्तदान केले.
प्रत्येक रक्तदात्याला एचडीएफसी बॅंक तर्फे प्रमाणपत्र व भेटवस्तु देण्यात आले. रक्तदान शिबीराचे प्रकल्प प्रमुख गिरीश सिंघानिया होते. यावेळी जेसीआय अकोला सिटीचे अतुल आखरी, गिरीश सिंघानिया, प्रा.कविता चांडक, टिशा चांडक, शैलेंद्र अग्रवाल तसेच एचडीएफसी बॅक आणि महाबीजचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.