अकोला दिव्य ऑनलाईन : कोलकाताच्या सरकारी रुग्णालयातील प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या बलात्कार व हत्येप्रकरणी ठिकठिकाणी आंदोलनं सुरू असून इंडियन मेडिकल असोसिएशनने (IMA) देखील याबाबत आक्रमक पवित्रा घेतला आहे. आयएमएनं उद्या शनिवार १७ ऑगस्ट रोजी देशव्यापी संप पुकारला आहे. IMA अकोला शाखेकडून या अनुषंगाने उद्या शनिवार १७ ऑगस्टला निषेध दिन पाळून सकाळी ६ वाजेपासून तर रविवार १८ ऑगस्ट २०२४ सकाळी ६ वाजेपर्यंत २४ तासांसाठी ॲलोपॅथी डॉक्टरांची बंद राहील, असे जाहीर करण्यात आले आहे. सर्व अत्यावश्यक सेवा मात्र सुरू ठेवण्यात आली आहे. यामुळे नियमित ओपीडीत काम बंद राहील पण अपघातग्रस्तांना आकस्मिक सेवा दिली जाईल. वैकल्पिक, तातडीच्या नसलेल्या शस्त्रक्रियाही केल्या जाणार नाहीत. ज्या ठिकाणी आधुनिक वैद्यक डॉक्टर्स सेवा देत आहेत त्या सर्व क्षेत्रांमधील सेवा २४ तासांसाठी बंद राहतील. अकोला शहरातील ॲलोपॅथीचे सर्व दवाखाने, क्लिनिक, ओपीडी इत्यादी सेवा १७ ऑगस्टला बंद ठेवण्यात येणार आहेत. अशी माहिती अकोला शाखेचे अध्यक्ष डॉ. राजेन्द्रकुमार सोनोने यांनी देताना सांगितली की, डॉक्टरांचा न्याय्य हक्कांसाठी हा बंद असल्याने रुग्णांनी सहकार्य करावे, असे आवाहन केले.
आयएमएनं म्हटलं आहे की, कोलकाता येथील मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमधील क्रूर घटना व स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला आंदोलक विद्यार्थ्यांसोबत झालेल्या गुंडगिरीने वैद्यकीय क्षेत्रालाच नव्हे तर देशाला मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे कामाच्या ठिकाणी डॉक्टरांच्या सुरक्षेचा महत्वाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. फार पूर्वीपासून प्रलंबित सुरक्षेसंदर्भातील मागण्यांसाठी निवासी डॉक्टर्स देशव्यापी संपावर गेले आहेत. आयएमएतर्फेही देशभरात निदर्शने करुन मार्च काढण्यात आले. आरजीकार महाविद्यालयातील अधिकाऱ्यांनी गुन्ह्याची परिस्थिती अतिशय हलगर्जीपणे, निष्काळजीपणे हाताळली. पोलिस तपासही जाणिवपूर्वक रखडवला गेला. जेणेकरून या प्रकरणातील हाय प्रोफाईल गुन्हेगार सुटतील. मात्र अखेर १३ ऑगस्ट २०२४ रोजी, कोलकाता उच्च न्यायालयाने राज्य पोलिसांना आतापर्यंतच्या तपासावर असमाधान व्यक्त करून हे प्रकरण केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI) कडे सोपविण्यास सांगितले आहे. राज्य पोलिसांनी त्यांचा तपास सुरू ठेवल्यास पुरावे नष्ट होण्याची शक्यताही त्यांनी वर्तवली. डॉक्टर्स विशेषत: स्त्री डॉक्टर्स हिंसाचाराला वारंवार बळी पडतात. डॉक्टर्सच्या सुरक्षेबाबत संबंधित अधिकाऱ्यांच्या उदासीनता आणि असंवेदनशीलतेमुळेच डॉक्टर्स, परिचारिका आणि इतर आरोग्यसेवा कर्मचाऱ्यांवर वारंवार शारीरिक हल्ले होतात, रूग्णालयात राडे होत राहतात.अशात स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला आंदोलक विद्यार्थ्यांवर उसळलेल्या गुंडगिरीच्या पार्श्वभूमीवर, IMAने बंद पुकारला आहे.