अकोला दिव्य ऑनलाईन : गैरवर्तणुकीपाठोपाठ भारतीय प्रशासकीय सेवेची (आयएएस) पदवी संपादन करण्यासाठी बारा वेळा ‘यूपीएससी’च्या परीक्षा देणाऱ्या वादग्रस्त पूजा खेडकरला दिल्लीतील पटियाला हाउस उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन नाकारला. त्यामुळे तिला कधीही अटक होण्याची शक्यता असल्याने तिने देशातून दुबईला पलायन केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
दिल्लीत बड्या नेत्याच्या घरी वास्तव्य?
प्रशिक्षणार्थी सनदी अधिकारी पूजा खेडकरची केंद्रीय लोकसेवा आयोगाने आयएएस म्हणून उमेदवारी रद्द केली. त्यापूर्वी खेडकर हिने यूपीएससी अथवा केंद्रीय कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाकडून कारवाई केली जाण्याची शक्यता असल्याचे गृहीत धरून दिल्लीच्या पटियाला हाउस उच्च न्यायालयात अंतरीम अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. त्यासाठी काही दिवस पूजा खेडकर दिल्लीतील एका बड्या नेत्याच्या निवासस्थानी राहिल्याची खात्रीशीर माहिती पुढे आली आहे.
पटियाला हाउस उच्च न्यायालयात बुधवार आणि गुरुवारी अशी दोन दिवस सुनावणी सुरू होती. खेडकर हिच्या वकिलाने युक्तिवाद दरम्यान पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांच्यावर आरोप केले होते. गुरुवारी न्यायालयाने निकाल देताना तिचा अटक पूर्व जामीनअर्ज फेटाळून लावला. त्यामुळे तिला कधीही अटक होण्याची शक्यता निर्माण झाल्यानेच तिने भारताबाहेर पळ काढल्याची चर्चा सुरू झाली आहे. ती दुबईला फरारी झाल्याचे उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले. मात्र, ती दुबईला फरार होत असताना त्याबाबत पोलिस; तसेच अन्य यंत्रणा दक्ष नव्हत्या का, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.