अकोला दिव्य ऑनलाईन : अकोला येथील आक्रमक झालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आमदार मिटकरी यांची गाडी फोडल्यानंतर यात सहभागी मनसे पदाधिकारी जय मालोकार यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. या प्रकरणी जय मालोकार यांच्या नातेवाईकांनी चौकशी करुन दोषींवर कारवाईची मागणी केली आहे.’या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे’
या बाबत जय मालोकर यांचे नातेवाईक डॉ. किशोर मालोकर एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले की, जय याला त्यावेळी लोटालाटी झाली होती. त्याच्यावर दबाव आणला होता. अमोल काळणे नावाच्या व्यक्तिने त्याच्यावर जास्त प्रेशर आणले.या दबाव वाढत गेला. त्यामुळे या घटनेची चौकशी करुन त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. यासाठी आम्ही पोलिसात तक्रार करणार आहे, असंही मालोकार म्हणाले. पोलिसांनी सीसीटीव्ही तपासून कारवाई केली पाहिजे. त्यावेळी मालोकार याच्यासोबत झटापट झाली, यावेळी तिथे असणाऱ्या सर्वांवर कारवाई केली पाहिजे, अशी मागणीही डॉ.किशोर मालोकार यांनी केली.
अकोल्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रवक्ते मिटकरी यांच्या विरोधात मनसेचे कार्यकर्ते आक्रमक झाले. तेव्हा राष्ट्रवादी आणि मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाचीही झाली. मात्र, पोलिसांनी सर्व कार्यकर्त्यांना रोखल्यामुळे मोठा संघर्ष टळला. दरम्यान, या घटनेनंतर आता मनसे आणि अजित पवार गटातील संघर्ष तीव्र होण्याची शक्यता आहे.