अकोला दिव्य ऑनलाईन : गेल्या आठवडाभरात शहरात सर्वत्र पाऊस सुरू असून वातावरणात बदल झालेला आहे. शहरातील एकुणच परिस्थिती अकोलेकर ‘साथी’ च्या विळख्यात सापडले आहेत.वेळीच उपाययोजना करण्यात आल्या नाही तर साथीच्या आजारांचा विस्फोट निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही बाब लक्षात घेऊन महापालिका प्रशासनाने आजारांचे थैमान व रोगराई थांबविण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्या, अशी मागणी निलेश देव मित्र मंडळाचे प्रमुख व सामाजिक कार्यकर्ते निलेश देव यांनी आयुक्तांकडे केली आहे.
शहरात गेल्या आठवड्यापासून सुरू पावसामुळे जागोजागी पाण्याची डबकी साचलेली आहे. रस्त्यांच्या बाजूला, खुल्या भूखंडांमध्ये मोठ्या प्रमाणात डबकी आणि चिखल तयार झाला आहे. नाल्या तुंबलेल्या असल्याने पावसाच्या पाणी पाण्यासोबत नालीतील घाण पाणी रस्त्यावरून वाहते झाले. दुर्गंधीने यात भर पडली आहे. या पोषक वातावरणाने चिलटे आणि डांसांची उत्पत्ती वाढत चालली आहे.यामुळे साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.
अनेक ठिकाणी नाल्या खोदून ठेवल्याने, त्या ठिकाणचे पाणी वाहून गेले नाही आणि खोदून ठेवलेली माती पावसाच्या पाण्याने रस्त्यावर पसरल्याने समस्या निर्माण झाल्या आहेत. शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले आहेत. या कचऱ्यातून दुर्गंधी व डासांची निर्मिती होत आहे. या सर्व बाबी लक्षात घेता शहरात येत्या काही दिवसात मोठ्या प्रमाणात आजारांचे थैमान व रोगराई पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे महानगरपालिकेने तातडीने उपाययोजना करून शहरात स्वच्छता व साफसफाई बाबत काळजी घ्यावी, डासांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रत्येक प्रभागात औषध फवारणी, धूर फवारणी करावी. तुंबलेल्या नाल्या दररोज मोकळ्या करण्यात याव्या, अशी मागणी निलेश देव यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.