अकोला दिव्य ऑनलाईन : आज सकाळपासूनच जवळजवळ संपूर्ण महाराष्ट्रात पावसाने धुमाकूळ घातला आहे.अख्ख्या पुणे शहराला पावसाने वेढा घातला असून येथे जनजीवन विस्कळित झाले आहे. पुण्यात रात्रभरापासून मुसळधार पाऊस सुरू आहे. पुणे शहराच्या अनेक भागांत पाणी साचले आहे.अनेक सोसायट्यांमध्ये पाणी शिरले आहे. याशिवाय पुण्यातील डेक्कन परिसरातील घरांमध्ये पाणी शिरले आहे. यामुळे अनेक लोक पाण्यात अडकून पडले आहेत. प्रशासनाकडून त्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पुण्यातील खडकवासला परिसरात अतिवृष्टीचा अंदाज असल्याने खडकवासला धरणातून ४० हजार क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.पुणे जिल्ह्यात रेड अलर्ट जारी केले आहे.
कोल्हापूरमधील राधानगरी धरणाचीही पाणी पातळी वाढली आहे, त्यामुळे धरणाचा स्वयंचलीत दरवाजा उघडण्यात आला आहे. राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात काल रात्रीपासूनच मुसळधार पाऊस कोसळत आहे. दरम्यान पुढील चार तासात संपूर्ण महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे सखल भागात पूरस्थिती निर्माण होऊ शकते, त्यामुळे वाहतूक कोंडी होऊ शकते. तेव्हा अत्यंत गरजेचे असेल तरच बाहेर पडा असा आवाहन शासनाकडून करण्यात येत आहे.
विदर्भातील चंद्रपूर, यवतमाळ, भंडारा या जिल्ह्यात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. अकोला अमरावती नागपूर जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली असून या जिल्ह्यात येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.