Friday, October 18, 2024
Homeताज्या बातम्याआज मतमोजणी ! अकोला जनता बॅकेच्या १२ हजार २२४ सदस्यांनी मतदानाचा हक्क...

आज मतमोजणी ! अकोला जनता बॅकेच्या १२ हजार २२४ सदस्यांनी मतदानाचा हक्क बजावला

अकोला दिव्य ऑनलाईन : अकोला जनता बँकेच्या २०२४-२०२९ या पुढील 5 वर्षांकरीता संचालक मंडळाच्या निवडीसाठी सर्व साधारण मतदारसंघातील १४ उमेदवारांमध्ये १३ सदस्यांच्या निवडीसाठी काल बुधवार 24 जुलै रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ४ पर्यंत झालेल्या ६५ मतदान केंद्रावर एकूण ६८ हजार ६९२ सभासदांपैकी १२ हजार २२४ सभासदांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. यापैकी १० हजार ७०६ पुरुष तसेच १ हजार ५१८ महिला सभासदांनी मतदान केले. काल झालेल्या मतदानाची मतमोजणी आज गुरुवार दि. २५ जुलै २०२४ रोजी सकाळी ११ वाजता पासून अकोला येथील वर्धमान भवन येथे होणार आहे. अशी माहिती निवडणूक विभागाने दिली आहे.

अकोला जनता बॅकेच्या एकुण १८ संचालकांची निवड करण्यासाठी सर्वसाधारण मतदार संघातून १३ प्रतिनिधी, महिला मतदार संघातुन २ प्रतिनिधी, शाखा प्रतिनिधी मतदार संघातून २ प्रतिनिधी, अनुसुचित जाती/जमाती मतदार संघातून १ प्रतिनिधी निवडून द्यावयाचे आहेत. त्याअनुषंगाने संचालक मंडळाच्या निवडणुकीचा कार्यक्रम १५ जुन २०२४ रोजी प्रसिध्द करण्यात आला. सर्व साधारण मतदारसंघातील १३ जागांसाठी ३३ उमेदवारांनी भरलेल्या अर्जाची छाननी केल्यानंतर २ उमेदवारी अर्ज अपूर्ण असल्यामुळे नामंजूर करण्यात आले. उर्वरीत ३१ उमेदवारांपैकी १७ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे उर्वरीत १४ उमेदवारांमध्ये १३ जागांसाठी २४ जुलै रोजी निवडणुक घेतली गेली आहे.

महिला प्रतिनिधी मतदारसंघातील २ जागांसाठी ६ उमेदवारी अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी १ नामनिर्देशनपत्र छाननीअंती नामंजूर करण्यात आले. तसेच उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या कालावधीत एकुण ३ उमेदवारांनी त्यांचे नामनिर्देशनपत्र मागे घेतले आहे. त्यामुळे महिला प्रतिनिधी या मतदारसंघातून निवडून द्यावयाच्या २ जागांसाठी २ उमेदवारांचे उमेदवारी अर्ज असल्यामुळे मतदान घेण्याची आवश्यकता नाही.

शाखा प्रतिनिधी मतदारसंघातील २ जागांसाठी ३ उमेदवारी अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी १ नामनिर्देशनपत्र छाननीअंती नामंजूर करण्यात आले. त्यामुळे शाखा प्रतिनिधी या मतदारसंघातून निवडून द्यावयाच्या २ जागांसाठी २ उमेदवारांचे उमेदवारी अर्ज असल्यामुळे मतदानाची घेण्याची आवश्यकता नाही.

अनुसुचित जाती/जमाती प्रतिनिधी मतदारसंघातील १ जागेसाठी ३ उमेदवारी अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी १ नामनिर्देशनपत्र छाननीअंती नामंजूर करण्यात आले. तसेच उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या कालावधीत एका उमेदवारांने नामनिर्देशनपत्र मागे घेतले आहे. त्यामुळे अनुसुचित जाती/जमाती प्रतिनिधी या मतदारसंघातून निवडून द्यावयाच्या एका जागेसाठी एकच उमेदवाराचा उमेदवारी अर्ज असल्यामुळे निवडणुक घेण्याची आवश्यकता नाही.

सर्व साधारण मतदारसंघातील १४ उमेदवारांमध्ये १३ जागांसाठी मतदान घेतले गेले आहे. सदर मतदारसंघातील मतदानासाठी ६५ मतदान केंद्रांवर काल बुधवार 24 जुलैला मतदान झाले आणि आज गुरुवार 24 जुलैला मतदानाची मोजणी करून निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

निवडणुक निर्णय अधिकारी तथा अकोला जिल्हाधिकारी अजित कुंभार तसेच सहायक निवडणुक निर्णय अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील व सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी जिल्हा उपनिबंधक डॉ. प्रविण लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली मतदान प्रक्रिया पार पडली. ही प्रक्रिया पार पाडण्यासाठी महसुल व सहकार विभागातील अधिकारी कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!