Sunday, November 24, 2024
Homeराजकारणअकोल्यात आव्हान मात्र पश्चिम वऱ्हाडात पक्ष वाढीसाठी शिंदे गटाचा डाव !

अकोल्यात आव्हान मात्र पश्चिम वऱ्हाडात पक्ष वाढीसाठी शिंदे गटाचा डाव !

अकोला दिव्य ऑनलाईन : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सर्वच पक्ष जोमाने कामाला लागले असून, महाराष्ट्र राज्यात यश मिळवण्यासाठी विभागनिहाय मोर्चेबांधणी केली जात आहे. शिंदे गटाकडून पश्चिम विदर्भात पक्षवाढीचे लक्ष्य ठेवून त्यासाठी पक्षाला केंद्र शासनामध्ये मिळालेले एकमेव केंद्रीय राज्यमंत्री पद व विधान परिषदेचे भावना गवळी यांना सदस्यत्व देऊन मुख्यमंत्री शिंदे यांनी या भागाला झुकते माप दिले. अकोला जिल्ह्यात मात्र पक्षातील मरगळ कायम असून संघटनात्मक वाढीचे आव्हान आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे खासदार प्रतापराव जाधव व दोन्ही आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले. यवतमाळ व वाशीमच्या माजी खासदार भावना गवळी यांनी देखील शिंदेंना साथ दिली.

शिवसेनेचे वर्चस्व असलेल्या पश्चिम विदर्भातील लोकसभेच्या जागा कायम राखण्याचे मोठे आव्हान एकनाथ शिंदेंपुढे होते. त्यामध्ये बुलढाण्यात यश तर यवतमाळ-वाशीम मतदारसंघात अपयश मिळाले. बुलढाणा मतदारसंघात ऐनवेळी आखलेली रणनीती प्रतापराव जाधव यांच्या पथ्यावर पडली. त्यामध्ये प्रदेश स्तरावरील रामेश्वर पवळ यांचे नियोजन महत्त्वपूर्ण ठरले. केंद्र शासनामध्ये स्वतंत्र प्रभार असलेले राज्यमंत्री पद शिवसेना शिंदे गटाला मिळाले. यानिमित्ताने जाधव यांच्या माध्यमातून शिवसेना शिंदे गटाच्या कोट्यातून पश्चिम वऱ्हाडाला केंद्रीय मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व मिळाले.

लोकसभेची उमेदवारी नाकारल्यानंतर भावना गवळी यांना विधान परिषदेवर घेऊन त्यांचे पुनर्वसन करण्यात आले आहे. केंद्रातील मंत्रिपद व विधान परिषदेच्या सदस्यत्वामुळे शिवसेना शिंदे गटाने पश्चिम वऱ्हाडाला बळ दिले आहे. पश्चिम वऱ्हाडातील अकोला, वाशीम व बुलढाणा जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीमध्ये यश मिळण्यासाठी शिंदे गटाकडून हा डाव टाकण्यात आला. तीन जिल्ह्यात पक्षसंघटन मजबूत करून विधानसभेच्या अपेक्षित जागा निवडून आणण्याचे आव्हान केंद्रीय मंत्री जाधव व आ. गवळी यांच्यापुढे राहील.

अकोला जिल्ह्यामध्ये संघटनात्मक पातळीवर शिंदे गटाची वाढ झालेली नाही. सेनेचे दोन गट पडल्यानंतर ठाकरे गटातील काही नेत्यांनी शिंदे गटाची वाट धरली. तरी तळागाळातील सर्वसामान्य शिवसैनिक उबाठा सेनेसोबत असल्याचे दिसून येते. शिवसेना शिंदे गटाकडून अकोला जिल्ह्यात संघटनात्मक फेरबदल करण्यात आले. मात्र, पक्षात फारसा फरक पडलेला नाही. आता विधानसभेच्या तोंडावर पक्षाला बळकटी देण्यासोबतच निवडणुकीच्या तयारीवर भर द्यावा लागणार आहे.

शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे राज्यातील सर्व विभागावर बारीक लक्ष ठेवून आहेत. पश्चिम विदर्भातील केंद्रीय राज्यमंत्री जाधव, विधान परिषद आमदार भावना गवळी व पूर्व विदर्भातील कृपाल तुमाने यांना बळ दिले. या भागात पक्ष संघटन अधिक मजबूत करून आगामी निवडणुकीत यश मिळवण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जात आहे.असे राज्य समन्वयक रामेश्वर पवळ यांनी अकोला दिव्य ऑनलाईन सोबत बोलताना सांगितले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!