अकोला दिव्य ऑनलाईन : अकोला जनता कमर्शियल को-ऑप बॅंकेच्या सन 2024 ते 2029 या पाच वर्षांकरीता नवीन संचालक मंडळाच्या निवडीसाठी उद्या बुधवार दिनांक 24 जुलै 2024 रोजी सकाळी 8 वाजतापासून मतदानाला सुरुवात होऊन दुपारी 4 वाजता पर्यंत मतदान प्रक्रिया राबविली जाणार आहे. संचालक मंडळाच्या एकुण 18 सदस्यांच्या निवडीसाठी राबविण्यात येत असलेल्या निवडणूक प्रक्रियेत 3 मतदारसंघ अविरोध असून सर्वसाधारण मतदार संघातून 13 सदस्यांचा निवडीसाठी उद्या मतदान होणार आहे.
मतदारांना एकुण जास्तीत जास्त 13 (तेरा) मते देण्याचा अधिकार आहे. त्यापेक्षा जास्त मते दिले तर संपुर्ण मतपत्रिका अवैध ठरविली जाईल. मत नोंदवताना ज्या उमेदवारास मत द्यावयाचे असेल त्याचे नाव असलेल्या चिन्हावर ‘X’ असा शिक्का नोंदवावा. ज्या उमेदवारास मत द्यावयाचे आहे, त्याचे नाव असलेल्या दोन आडव्या रेषांमध्येच ‘X’ चा शिक्का 50 टक्के पेक्षा जास्त उमटेल अशा पध्दतीने उमटवावा, अन्यथा मत अवैध ठरविले जाईल.
- ‘X’ चा शिक्का उमटवताना सुस्पष्ट दिसेल अशा स्वरुपात मत नोंदवावे. याबाबत कोणतीही संदिग्धता निर्माण झाल्यास आपले मत अवैध ठरविण्यात येईल. मतांच्या नोंदविण्याबाबत संदिग्धता निर्माण झाल्यास निवडणुक निर्णय अधिकारी यांचा निर्णय अंतिम असेल.अशी माहिती सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी तथा अकोला जिल्हा सहकारी संस्था अकोला जिल्हा उपनिबंधक डॉ.प्रविण एच. लोखंडे यांनी दिली.
अकोला जनता बँकेच्या 13 संचालकांच्या निवडीसाठी मतदान होत असल्याने मतदारांना एकुण जास्तीत जास्त 13 (तेरा) मते देण्याचा अधिकार आहे. त्यापेक्षा जास्त मते दिले तर संपुर्ण मतपत्रिका अवैध ठरविली जाईल. हे कायदेशीर आहे. कारण 13 जणांची निवड करावयाची आहे. पण मतदाराने केवळ 1 वोट दिले तरी ते वैध राहणार आहे. तसेच 1 पेक्षा जास्त पण वोट करता येईल. मात्र ते 13 पेक्षा जास्त नको. 13 पेक्षा जास्त वोट असलेली मतपत्रिका बाद केली जाईल.