Friday, October 18, 2024
Homeताज्या घडामोडीManorama Khedkar Arrested : IAS पूजा खेडकर यांच्या आईला रायगडमधून अटक

Manorama Khedkar Arrested : IAS पूजा खेडकर यांच्या आईला रायगडमधून अटक

अकोला दिव्य ऑनलाईन : प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर वादात अडकल्यानंतर त्यांच्या कुटुंबाविषयी विविध प्रकरणे समोर आली. त्यांच्या आई डॉ. मनोरमा खेडकर यांनी मुळशी तालुक्यातील पौड येथे एका शेतकऱ्याला पिस्तुल दाखवून धमकवल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर पौड पोलिसांनी मनोरमा खेडकर यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला. मात्र दरम्यान मनोरमा खेडकर या बेपत्ता झाल्या होत्या. आज अखेर रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या पार्वती लॉज येथून त्यांना साडे पाच वाजता ताब्यात घेण्यात आले. पुणे ग्रामिण पोलीसांनी ही कारवाई केली.

मनोरमा खेडकरांच्या अटकेसाठी पुणे ग्रामीण पोलिसांची तीन पथके त्यांचा शोध घेत होती. रायगड जिल्ह्याच्या महाड तालुक्यातील हिरकरणवाडीमधील पार्वती लॉजमध्ये त्या लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून त्यांना अटक केली. तिथून त्यांना पुण्यात नेण्यात येत आहे. रायगड पोलीसांनी या अटकेला दुजोरा दिला आहे. दरम्यान पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर अद्यापही फरार आहेत. पूजा खेडकर वादात सापडल्यानंतर त्यांच्या आई मनोरमा खेडकर यांचा एक जुना व्हिडीओ व्हायरल झाला होता.

या व्हिडीओमध्ये मनोरमा खेडकर या एका शेतात हातात पिस्तुल घेऊन शेतकऱ्यांना दमदाटी करत असल्याचे दिसले. शिवाय, यावेळी मनोरमा यांच्यासोबत त्यांचे अंगरक्षकदेखील होते. जमिनीच्या मालकीहक्कावरून वाद झाल्यानंतर मनोरमा खेडकर थेट हातात पिस्तुल घेऊन शेतकऱ्यांना धमकावू लागल्या. त्यांच्या मुलीचे वर्तन चर्चेचा विषय ठरल्यानंतर त्यांच्या आईच्या व्हिडीओमुळे आणखी टीका होऊ लागली होती.

पूजा खेडकर यांनी अंबर दिवा लावलेली ऑडी कार जप्त करण्यासाठी पोलीस कर्मचारी त्यांच्या पुण्यातील घरी गेले असता त्यांच्याशीही मनोरमा अरेरावीने बोलत असल्याचे व्हिडीओ व्हायरल झाले. त्यानंतर हातात पिस्तुल घेतलेला हा व्हिडीओ व्हायरल झाला. ही घटना घडली, तेव्हा याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. मात्र, या व्हिडीओवर संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्यानंतर स्थानिक शेतकऱ्यांच्या तक्रारीवरून पौड पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!