अकोला दिव्य ऑनलाईन : आषाढी एकादशिनिमित्त विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूर येथे जाणाऱ्या भाविकांकरीता दक्षीण-मध्य रेल्वेने नांदेड विभागातून तीन विशेष रेल्वे गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे, यामध्ये अकोला येथून मंगळवार, १६ जुलै रोजी विशेष एक्स्प्रेस सोडण्यात येणार आहे. यंदा आषाढ एकादशी १७ जुलै रोजी येत आहे. विठ्ठलाच्या दर्शनासाठी यात्रेकरू प्रवासी मोठ्या संख्येने पंढरपूरकडे जाणार आहेत. त्यानुसार, या यात्रेकरू प्रवाशांच्या प्रवासाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी दक्षिण मध्य रेल्वे नांदेड विभागातील नगरसोल, अकोला आणि आदिलाबाद येथून विशेष गाड्या चालवणार आहे.
दक्षीण-मध्य रेल्वेन जारी केलेल्या पत्रकानुसार, गाडी क्र. ०७५०५ अकोला-पंढरपूर विशेष रेल्वे गाडी मंगळवार, १६ जुलै रोजी अकोला स्थानकावरून सकाळी ११ वाजता रवाना होऊन बुधवार, १७ जुलै रोजी पंढरपूर स्थानकावर सकाळी १०:५० वाजता पोहोचणार आहे. परतीच्या प्रवासात ०७५०६ पंढरपूर-अकोला विशेष रेल्वे गाडी बुधवार, १७ जुलै रोजी पंढरपूर स्थानकावरून रात्री २१:४० वाजता रवाना होऊन गुरुवार, १८ जुलै रोजी रात्री २०.०० वाजता अकोला स्थानकावर पोहोचणार आहे. या विशेष गाड्यांमध्ये १ वातानुकूलित, ४, स्लीपर क्लास आणि १७ सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे आहेत.
विशेष गाडीला दोन्ही बाजुच्या प्रवासात वाशिम, हिंगोली, बसमत, पूर्णा, परभणी, गंगाखेड, परळी वैजनाथ, पानगाव, लातूर रोड, उदगीर, भालकी, बिदर, जाहिराबाद, विकाराबाद, तांदूर, सेरम, चित्तपुर, वाडी, कलबुरगी, सोलापूर, कुरडूवाडी रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात आला आहे.अशी माहिती दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागिय रेल्वे उपभोक्ता सल्लागार समिती सदस्य अँड. एस.एस ठाकूर यांनी दिली.