Wednesday, December 4, 2024
Homeगुन्हेगारीमनसे जिल्हाध्यक्षावर भरदुपारी गोळीबार ! गंभीर जखमी अवस्थेत…..

मनसे जिल्हाध्यक्षावर भरदुपारी गोळीबार ! गंभीर जखमी अवस्थेत…..

अकोला दिव्य ऑनलाईन : चंद्रपूर शहरातील अतिशय वर्दळीचे ठिकाण असलेल्या रघुवंशी कॉम्प्लेक्स येथे महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष अमन अंधेवार यांच्यावर अज्ञात व्यक्तीने गोळीबार केल्याने खळबळ उडाली आहे. या गोळीबारात अंधेवार यांच्या पाठीला गोळी लागल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना प्राथमिक उपचारानंतर नागपूर येथे हलविण्यात आले आहे. दरम्यान तीन वर्षांत रघुवंशी कॉम्प्लेक्स येथे दुसऱ्यांदा गोळीबाराची घटना घडल्याने भितीचे वातावरण आहे.

शहराच्या मध्यभागी आझाद बगीच्यालगत रघुवंशी कॉम्प्लेक्स ही इमारत आहे. बँक, शिकवणी वर्ग, जिम, मसाज सेंटर व बियर बारमुळे या कॉम्प्लेक्समध्ये सकाळपासून रात्री उशिरापर्यंत लोकांची वर्दळ असते. याच कॉम्प्लेक्समध्ये मनसेच्या कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष अमन अंधेवार यांचे कार्यालय आहे. आज गुरुवार ४ जुलै रोजी दुपारी दिड वाजताच्या सुमारास अंधेवार कार्यालयात येण्यासाठी रघुवंशी कॉम्प्लेक्सच्या लिफ्टजवळ आले. तिथे त्यांनी लिफ्टची बटन दाबली आणि लिफ्टचा दरवाजा उघडण्यापूर्वीच त्यांच्या मागून आलेल्या एका अज्ञात व्यक्तीने गोळीबार केला. या व्यक्तीने बंदुकीतून दोन फायर केल्या. त्यातील एक गोळी अंधेवार यांना चाटून गेली तर दुसरी गोळी त्यांच्या पाठीला लागली. गोळीबार होताच काॅम्पलेक्समध्ये एकच धावपळ उडाली. या कॉम्पलेक्समध्ये ५० पेक्षा अधिक व्यावसायिक दुकाने आहेत. त्यामुळे सर्व जण दुकानातून बाहेर आले व बघायला लागले तर अंधेवार यांच्या पाठीवर गोळी लागल्याने जखमी झाले होते. त्यांच्या पाठीतून रक्त निघत होते तर गोळीबार करणारा घटनास्थळावरून पसार झाला होता. त्याच वेळी अंधेवार जीव वाचविण्याच्या भितीने याच कॉम्पलेक्समधील हासानी यांच्या कपड्याच्या दुकानात गेले. तिथे ते एक लाकडी दांडा हातात घेवून बाहेर आले. मात्र तोपर्यंत गोळीबार करणारा पसार झाला होता.

घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस ठाणे ठाणेदार प्रभावती एकुरके ताफा घेवून घटनास्थळी पोहोचल्या. स्थानिक गुन्हे शाखेचे महेश कोंडावर हे देखील घटनास्थळी आले. त्यांनी जखमी अंधेवार यांना कुबेल हॉस्पीटल येथे उपचारासाठी नेले. तिथे प्राथमिक उपचार केल्यानंतर नागपूर येथे हलविण्यात आले.

या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अति.पोलीस अधीक्षक रिना जनबंधु घटनास्थळी आले. यावेळी कॉम्प्लेक्समधील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. या सीसीटीव्ही फुटेजमध्ये गोळीबार करणारी अज्ञात व्यक्ती तोंडाला पांढरा रूमाल बांधून फिरत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. विशेष म्हणजे तीन वर्षांपूर्वी २०२१ मध्ये अंधेवार यांचे लहान भाऊ यांच्यावरही रघुवंशी कॉम्पलेक्स येथे गोळीबार झाला होता. तेव्हाही अंधेवार थोडक्यात बचावले होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!