अकोला दिव्य ऑनलाईन : अकोला येथील पोलिस अधीक्षक कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या उद्योजकांच्या घरात घुसून सोन्याचे दाग-दागिने व मोबाईल लुटून नेणाऱ्या टोळीचा म्होरक्या दुसरा कोणीही नसून, २२ वर्षांपूर्वी केडियांनी कामावरून काढलेला ‘पुष्पराज’ निघाला आहे. अकोला पोलीसांनी मध्य प्रदेशातून त्याला अटक केली आहे.त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून, या प्रकरणातील त्याच्या इतर पाच साथीदारांना जाळ्यात अडकविण्यासाठी पोलिसांनी सापळा रचला आहे,
आळशी प्लॉटमधील रहिवासी व व्यावसायिक नवल केडिया यांच्या निवासस्थानी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास पोलिसांसारखा गणवेश घातलेल्या अज्ञात व्यक्तींनी शिरकाव केला.एका मुलीच्या शोधात आल्याची बतावणी करणा-या या लोकांच्या हालचालीवर संशय आल्याने नवल केडिया यांनी आरडाओरड केली होती. तेव्हा शांत बस, नाहीतर मुंबई येथील तुझ्या मुलास जीवे ठार मारू अशी धमकी वजा इशाराही दिला होता. नेमका हाच धागा धरून खदान पोलिसांनी तपासाची दिशा निश्चित केली.
दरम्यान पोलिसांनी तयार केलेले संशयित दरोडेखोरांचे रेखाचित्र माध्यमांनी प्रसिद्ध केले. यासोबतच माहिती देणा-यास बक्षीसही जाहीर केले होते. पोलिसांना या माध्यमातून महत्त्वाची माहिती मिळाली आणि पोलिसांचे एक पथक मध्य प्रदेशातील सुरत येथे पोहोचले. या गुन्ह्यातील म्होरक्या पोलिसांच्या हाती लागला. सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देणारा पुष्पराजला पोलीस पथकाने त्याच्याविरुद्ध असलेले पुरावे उघड केल्यानंतर त्याने गुन्हा कबूल केला. या घटनेतील त्याच्या इतर ५ सहकाऱ्यांना अडकविण्यासाठी पोलिसांनी जाळे टाकले आहे.
२२ वर्षांनंतरही केडियांसाठी संवेदनशील ?
घरात दरोडेखोरांनी घातलेल्या उच्छादाने नवल केडिया पार घाबरून गेले होते. यामुळे पाय घसरून ते खाली कोसळले. केडिया यांची अवस्था बघून दरोडेखोरांनी पाणी आणून त्यांना पाजले. यासोबतच घरातील कुठल्याही सदस्यांना दुखापत केली नाही. तेव्हा अशा गुन्हेगारांमध्ये माणुसकी कशी ? हा प्रश्न निर्माण झाला आणि हाच धागा पकडून पोलीसांनी केडियांकडे बारीक सारीक बाबीला घेऊन सखोल माहिती घेतली अन् पुष्पराज अडकला.