अकोला दिव्य ऑनलाईन : शहरातील मालमत्ता कर वसुलीचा खाजगी कंत्राट एका कंपनीला देण्यात आलेला आहे. या प्रकरणात सुरू असलेले गैरप्रकार तसेच शहरातील इतर विविध जनहिताच्या मुद्द्यांना घेऊन ॲड. धनश्री देव स्मृति सेवा प्रकल्प तथा निलेश देव मित्र मंडळाचे प्रमुख निलेश देव यांनी पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांना निवेदन सादर केले आहे. या निवेदनातील मुद्द्यांवर तातडीने दखल घेतल्या गेली नाही तर येत्या 22 जुलैपासून अन्नत्याग आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी निवेदनातून दिलेला आहे.
अकोला शहरातील मालमत्तासह इतर कर वसुलीचा कंत्राट चुकीच्या पद्धतीने व नियमबाह्यपणे देण्यात आला आहे. कंपनीकडून अनेक गैरप्रकार व चुकीच्या पद्धतीने कर वसुली होत असून अपहार होत असल्याची माहिती आहे. याप्रकरणी तातडीने लक्ष घालून योग्य कारवाई करण्यात यावी. याबाबत ऑक्टोबर 2023 मध्ये सुद्धा पालकमंत्र्यांना निवेदन देण्यात आले होते.तसेच आझाद मैदानावर ५ दिवसाचे आंदोलन केले होते. तसेच एक लक्ष स्वाक्षऱ्यांचे निवेदन दिले होते. त्याची दखल घेतल्या गेली नाही. मात्र आता तातडीने याबाबत दखल घेण्यात यावी.
तसेच गेल्या 15 मार्च रोजी शास्ती अभय योजना कार्यान्वित करण्यात आली. परंतु ऑगस्ट 2023 ते मार्च 2024 पर्यंत व्याजासहित रक्कम वसूल करण्यात आली, त्या व्याजाच्या रकमेचे समायोजन करण्यात यावे. सदर रक्कम 15 कोटी रुपयांच्या जवळपास आहे. कोविड काळातील पाणीपट्टी माफ करून सरसकट एक हजार रुपये प्रति वर्ष पाणी पट्टी लावण्याची आवश्यकता आहे. आदी मुद्दे या निवेदनात नमूद करण्यात आले आहेत.
फेब्रुवारी 2022 मध्ये दिलेल्या विनंती अर्जानुसार मनपाच्या प्रशासकीय इमारतीला स्वातंत्र्यसैनिक दुर्गाताई जोशी यांचे नाव देण्यात यावे. त्यांनी स्वातंत्र्यासाठी लढा दिला असून अकोला पालिकेवर 1927 साली भारताचा तिरंगा ध्वज फडकविला होता. विदर्भाची वाघीण म्हणून त्यांची ओळख होती. तसेच प्रभाग क्र. 3 मध्ये चुकीच्या नियोजनामुळे टाकण्यात आलेली पाईपलाईन सहा वर्षांपासून विना वापर पडून आहे. त्यामुळे पाच कोटींचा खर्च झालेला निधी व्यर्थ ठरत असल्याने ही पाईपलाईन योग्य नियोजन करून वापरात आणल्या जावी.
गुंठेवारी प्रकरणांचे त्वरित सामान्य खरेदी व्यवहार चालू करण्यात यावेत. अकोला शहर अमृत 2 योजनेत अकोला शहरातील नवीन वस्ती अकोला पूर्व क्षेत्रात कामे देण्यात यावी. अमृत 2 मध्ये न्यू तापडिया नगर, खरप, उमरी भागात पाणीपुरवठ्याची पाईपलाईन टाकण्यात यावी. त्याचबरोबर ड्रेनेज व्यवस्था केंद्र सरकारच्या निधीतून करण्यात यावी. आदी मागण्या पालकमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आल्या असून या मागण्यांची तातडीने दखल घेण्यात आली नाही तर येत्या 22 जुलै पासून स्थानिक जठार पेठ चौक येथे अन्नत्याग आंदोलन प्रारंभ करणार असल्याचे निलेश देव यांनी पालकमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे. त्यामुळे आता पालकमंत्र्यांच्या भूमिकेकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागून आहे.