अकोला दिव्य न्युज ब्युरो : शहरासह जिल्ह्यात दोन दिवसांपासून ढगाळ हवामान पहावयास मिळाले. आज अकोलेकरांना सूर्यदर्शन उशिराने घडले. दहा वाजेच्या सुमारास कोवळी सूर्यकिरणे पडल्याचा अनुभव नागरिकांनी घेतला. दुपारीही उन्हाची तीव्रता फारशी जाणवत नव्हती; मात्र वातावरणात दमटपणा तयार झाल्याने नागरिकांना दिवसभर उकाडा जाणवला.
अरबी समुद्रापासून तर मालदीव अन् उत्तर महाराष्ट्रापर्यंत पश्चिम किनारपट्टीत कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने बेमोसमी पाऊस मध्य महाराष्ट्रासह विदर्भात होऊ शकतो. तसेच वादळवाऱ्यासह विजांचा कडकडाट व गारपिटीचीही शक्यता वर्तविण्यात आली आहे. शुक्रवार व शनिवार या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे रविवारी पाऊस होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. शहरासह जिल्ह्यातील काही तालुक्यांत पाऊस होऊ शकतो. सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
वातावरणात बदल झाल्यास हा अलर्टदेखील बदलू शकतो, असे हवामान खात्याने म्हटले आहे.गडगडाट व विजांचा कडकडाट होत असताना नागरिकांनी झाडाखाली किंवा उघड्यावर थांबू नये, विजा कोसळून हानी होण्याची शक्यता असते, यामुळे पशुधनदेखील सुरक्षित ठेवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.वातावरणात झालेल्या बदलामुळे बेमोसमी वादळी गडगडाटी पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. अकोला जिल्ह्यासाठी रविवारी अलर्ट देण्यात आला आहे. जिल्ह्यातील काही भागात अवकाळी पाऊस होऊ शकतो, असे हवामान खात्याने म्हटले आहे. यामुळे नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.