अकोला दिव्य ऑनलाईन : देशाच्या सार्वजनिक बँकिंग क्षेत्रातील अग्रगण्य बँक ऑफ महाराष्ट्र तर्फे वित्तीय वर्ष 2023-24 साठी घोषित केलेला 857.16 कोटी रुपये रकमेचा लाभांशाचा धनादेश अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना सादर केला. बँक ऑफ महाराष्ट्राचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी निधू सक्सेना यांनी बँकेचे कार्यकारी संचालक आशिष पांडे आणि संतोष दुलार, प्रभारी एनबीसीए व्हर्टिकल, बँक ऑफ महाराष्ट्र यांच्यासह भारत सरकारच्या वित्तीय सेवा विभागाचे सचिव विवेक जोशी यांच्या उपस्थितीत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लाभांश रकमेचा धनादेश स्विकारला. बँक ऑफ महाराष्ट्र तर्फे वर्ष 2024 साठी प्रत्येक समभागामागे 1.40 पैसे (14 टक्के) एवढा लाभांश घोषित करण्यात आला होता. सदर लाभांश प्रदानामुळे गत वित्तीय वर्षातील बँक ऑफ महाराष्ट्राची सर्वोत्तम कामगिरी प्रतिबिंबित होते. सन 2023 मधील 2 हजार 602 कोटी निव्वळ नफ्याच्या तुलनेत सन 2024 मध्ये बँकेच्या निव्वळ नफ्यात 55.84 टक्के वाढ होऊन बँकेने 4 हजार 55 कोटी एवढा निव्वळ नफा कमावला आहे.बँक ऑफ महाराष्ट्र सातत्याने सर्वोत्तम कामगिरीची नोंद करीत असून एकूण व्यवसाय व ठेवी संकलनात बँकेने सार्वजनिक बँकिंग क्षेत्रातील सर्व बँकांमध्ये प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. वित्तीय वर्ष 2023-24 मध्ये बँकेने आपल्या एकूण व्यवसायात 15.94 टक्के तर ठेवी संकलनात 15.66 टक्के वाढ नोंदविली आहे.
दर वर्षातील लक्षवेधक वित्तीय कामगिरीमुळे बँकिंग क्षेत्रातील एक मजबूत बँक म्हणून बँक ऑफ महाराष्ट्रने आपली जागा अधिक मजबूत झाल्याचे दाखवून दिले आहे. बाजारपेठेतील सातत्याने बदलत्या परीस्थितीशी सानुकुलीत करण्याची लवचिकता दर्शवून बँकेने सेवांचे वितरण व ग्राहकांचे समाधानात आघाडी घेतली आहे.
सर्वोत्तम कामगिरीत बँकेच्या कर्मचाऱ्यांचे परिश्रम व समर्पित वृत्ती आणि योग्य वेळी महत्वपूर्ण परिचालनात्मक निर्णय घेतल्याचे कामगिरीत प्रतिबिंबित झाले आहेत. डिजिटल तंत्र व अधिक सुलभ ग्राहक स्नेही बँकिंग प्रणालीवर लक्ष केंद्रित केल्याने बँकेला निव्वळ नफा व वाढीची हा प्रक्षेपमार्ग कायम ठेवण्यात यश प्राप्त झाले आहे. आजघडीला 28 राज्ये व 7 केंद्रशासित प्रदेशात बँकेच्या 2500 शाखा व 2206 एटीएम यंत्रे कार्यरत आहेत.