अकोला दिव्य ऑनलाईन : राज्य सरकारच्या कारभाराच्या विरोधात शुक्रवारी नागपूर शहर काँग्रेस समितीने आक्रमक भूमिका घेतली. व्हेरायटी चौकात चिखलफेक आंदोलन करीत राज्य सरकारच्या पुतळ्याला चिखल फासला. यावेळी आक्रमक कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करीत पोलिसांनी लावलेले बॅरीकेट ढकलून चौकाच्या मध्ये येत रस्ता रोको केला. पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता कार्यकर्ते व पोलिसांमध्ये ओढाताण झाली.
काँग्रेसचे शहर अध्यक्ष आ. विकास ठाकरे यांच्या नेतृत्वात काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते व्हेरायटी चौकात महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर जमले. गिरीश पांडव, अतुल कोटेचा, विशाल मुत्तेमवार, प्रशांत धवड, कमलेश समर्थ, मनोज सांगोळे, रोहीत यादव, नंदा पराते, नॅश अली यांच्यासह कार्यकर्त्यांनी राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यास सुरूवात केली. आ. विकास ठाकरे म्हणाले, राज्य सरकार जनविरोधी निर्णय घेत आहे. महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला नेले जात आहे.
सरकारी नोकर भरती केली जात नाही. स्पर्धा परीक्षा वेळेवर घेतल्या जात नाहीत. परीक्षा घेतल्या तर पेपरफुटीचे ग्रहण लागते. निट परिक्षेच्या पेपरफुटी व निकालातील गैरव्यवहारामुळे देशभरातील लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आणले आहे. या सर्व अनागोंदी कारभाराच्या विरोधात काँग्रेस कार्यकर्ते आक्रम झाले असून सरकारच्या विरोधात चिखलफेक आंदोलन करीत आहेत. यानंतरही सरकारने आपली जनविरोधी धोरणे बदलली नाही तर रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्याचा आ. ठाकरे यांनी दिला.
“यावेळी कार्यकर्त्यांनी सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याला चिखल फासला. पोलिसांनी बळाचा वापर करीत कार्यकर्त्यांकडून पुतळा ताब्यात घेतला. संतप्त कार्यकर्ते बॅरीकेट ढकलून देत चौकाच्या मधोमध आले व घोषणाबाजी करीत ठाण मांडले. कार्यकर्त्यांनी रस्ता रोको केल्यामुळे चौकात वाहतुकीचा खोळंबा झाला. पोलिसांनी बळाचा वापर करीत कार्यकर्त्यांना बाजुला करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलीस व कार्यकर्त्यांमध्ये ओढाताण झाली.
काँग्रेस नेत्यांच्या घरासमोर आंदोलन करणाऱ्यांवर कारवाई का नाही ?
लोकसभा निवडणुकीच्या काळात भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस नेते विलास मुत्तेमवार यांच्या घरासमोर आंदोलन केले. त्यांच्या विरोधात कुठलीही कारवाई झाली नाही. आम्हीही भाजप नेत्यांच्या घरावर मोर्चे काढू शकलो असतो. पण आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करीत असतानाही पोलिसांनी आम्हाला बॅरीकेटच्या मागे ढकलले. पोलिसांनी असा भेदभाव करू नये, अशी नाराजी काँग्रेस कार्यकर्त्यांनी यावेळी व्यक्त केली.