अकोला दिव्य न्युज ब्युरो : दक्षिण भारताला उत्तर भारताशी जोडणारा सर्वात सरळ व जवळचा अकोला-पूर्णा लोहमार्गाचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर होऊन १५ वर्षाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतरही हा मार्ग उपेक्षितच आहे. इतके वर्षे उलटूनही या मार्गावर चार दैनंदिन गाड्यांसह केवळ २३ रेल्वे धावत आहेत. एवढेच नव्हे, तर विद्युतीकरणाचे कामही अजून अपूर्णच आहे.
दक्षीण-मध्य रेल्वेच्या अखत्यारित येत असलेल्या या मार्गाचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर झाल्यानंतर १५ वर्षांपूर्वी नोव्हेंबर २००८ रोजी पहिली पूर्णा-अकोला पॅसेंजर धावली. त्यामुळे वाशिम, हिंगोली जिल्ह्यातील प्रवाशांच्या आशा पल्लवित झाल्या. या मार्गावर मोठ्या संख्येने प्रवासी गाड्या सुरू होतील, अशी अपेक्षा होती. परंतु, दक्षिण-मध्य रेल्वेकडून या मार्गावर मालगाड्याच अधिक चालविण्यात आला.
या मार्गासोबत दक्षिण-मध्य रेल्वे दुजाभाव करत असल्याची भावना या भागातील नागरिकांमध्ये आहे. गत १५ वर्षात अकोला-पूर्णा मार्गावर १ हमसफर, ७ सुपरफास्ट, ९ एक्स्प्रेस, ६ साप्ताहिक फेस्टिव्हल विशेष व १ पॅसेंजर अशा केवळ २३ रेल्वे धावत आहेत. अकोला-पूर्णा मार्गाचे विद्युतीकरण पूर्णा आऊटरपर्यंतच पूर्ण झालेले आहे. त्यामुळे या मार्गावर अजूनही पूर्णपणे विद्युत इंजिनने धावणारी रेल्वे गाडी सुरू करण्यात आलेली नाही. गेल्या १५ वर्षात या मार्गावर अकोलावरून सुरुवात होणारी एकही नियमित धावणारी लांब पल्ल्याची नवीन ट्रेन सुरू करण्यात आली नाही.
प्रलंबित मागण्या
- पॅसेंजरची संख्या वाढविणे • अकोला स्थानकांवर पिट लाईन बनविणे • नांदेड स्थानकावरून सुटणाऱ्या रेल्वे अकोला स्थानकावरून सुरू करणे • दक्षिण-मध्य रेल्वे मार्ग मध्य रेल्वेला जोडणे.