अकोला दिव्य ऑनलाईन : आगामी विधानसभा निवडणूकीत प्रहार पक्ष 20 जागा लढविणार असून, त्या जागा कशाप्रकारे लढवायच्या याबाबत आज गुरुवार 13 जुन रोजी मुंबई येथे बैठक होत आहे. या बैठकीत राज्यातील प्रमुख 20 पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. हे निश्चित आहे की 20 जागा लढविणार आहोत.तर त्या लढविताना विधानसभेत महाविकास आघाडीबरोबर जायचं की महायुतीबरोबर थांबायचं की स्वतंत्र लढायचं याबाबत सविस्तर चर्चा करूनच निर्णय घेऊ, अशी माहिती बच्चू कडू यांनी दिली.
यासंदर्भात नागपूर येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की, महायुतीत असलो तरी याचा अर्थ आम्ही निवडणूक लढवू नये, असा होत नाही. एक राजकीय पक्ष म्हणून आम्हाला निवडणूक लढवावीच लागेल, निवडणूक लढवणं हा कोणत्याही राजकीय पक्षाचा मुख्य उद्देश असतो, त्याशिवाय राजकारण पूर्ण होत नाही.
दरम्यान, या २० जागा या केवळ विदर्भातल्या असतील की संपूर्ण महाराष्ट्रातल्या, असं विचारलं असता, आम्ही संपूर्ण महाराष्ट्रातल्या २० जागांवर निवडणूक लढवू, अशी माहिती बच्चू कडू यांनी दिली.
मंत्रिपद मिळालं तरी घेणार नाही
पुढे बोलताना त्यांनी मंत्रिमंडळ विस्ताराबाबतही त्यांनी भाष्य केलं. मंत्रिमंडळ विस्तार झाला, तरी मला मंत्रीपद मिळणार नाही आणि त्यांनी मला मंत्रिपद दिलं, तरी मी ते घेणार नाही, असेही बच्चू कडू म्हणाले.