अकोला दिव्य न्युज ब्युरो : अकोल्यातील ख्यातनाम शैक्षणिक संस्थेकडून संचालित एका महाविद्यालयातील प्राचार्यांच्या स्वाक्षरीने एका बॅंकेच्या शाखेतील खात्यातून मागील २२ वर्षात कोट्यावधी रुपयांचा व्यवहार झाल्याची बाब लेखापरीक्षणातून उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे. बॅकेतील या खात्यातील व्यवहारासाठी फक्त प्राचार्यांना स्वाक्षरीचा अधिकार आहे. हे खाते वर्ष २००२ मध्ये उघडण्यात आले असले तरी, या खात्यात ख-या अर्थाने २०१० नंतरच मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. प्राचार्यांनी मागील १३ वर्षात केलेल्या कोटी रुपयांचा व्यवहार लेखापरीक्षणात कसा आला नाही, हे कोडे आहे.
विशेष म्हणजे तब्बल दोन तपानंतर लेखापरीक्षणातूनच हे खाते उघडकीस आले. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे सदर प्रकरण उघडकीस आल्यानंतर संस्थेकडून बॅंकेच्या सदर शाखेला पत्र देण्यात आले. मात्र या पत्रानंतरही खात्यातील लाखो रुपये, वळते करून खाते बंद करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. कोट्यावधी रुपयांच्या अफरातफरीचे हे प्रकरण उघडकीला आल्यानंतर, संस्थेच्याच ७ सदस्यांची चौकशी समिती नेमली गेली असली तरी, हा चौकशीचा फार्स कशासाठी, असा प्रश्न संस्थेच्याच सदस्यांकडूनच उपस्थित केला जात आहे.
अकोला शहरात विज्ञान, कला, वाणिज्य, विधी शाखांचे स्वतंत्र महाविद्यालय संचालित करणा-या या संस्थेचे अकोला शहरात एका शाखेतील एक मोठे महाविद्यालय असून या महाविद्यालयातील प्राचार्यानी हा व्यवहार केल्याने, मोठ्यांच्या पाठबळाशिवाय हे शक्य नाही. हे समजण्याएवढे कोणीही दुधखुळे नाही. तर उघडकीस आलेले आर्थिक घोटाळ्याचे प्रकरण सरळसरळ ‘मनीलॉन्ड्रींग’ असल्याचे मत कायद्यातज्ञांनी व्यक्त केले आहे. या खात्यात आलेली लाखो रुपयांची रक्कम कोणी व कशासाठी दिली. तसेच खात्यातून ‘रोख’ स्वरुपात काढण्यात आलेली रक्कम कोणाला व कशासाठी दिली. हे स्पष्ट होणे आवश्यक आहे.
या संस्थेच्या एकूणच कारभाराबाबत संशयकल्लोळ निर्माण झाला असून प्राचार्यांसोबत पदाधिकाऱ्यांची मिलीभगत आहे काय ? असा सूर उमटत आहे. (क्रमशः)